लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुलगी रात्रीची झोपत नाही. ती सतत मोबाइलवर असते. यामुळे वैवाहिक आयुष्यात अडसर ठरत असल्याच्या रागातून सावत्र वडिलानेच अमायरा शेख या चिमुकलीची गळा दाबून हत्या करत मृतदेह समुद्रात फेकल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी अँटॉपहिल पोलिसांनी इम्रान शेख (३४) या तरुणाला अटक केली आहे.
मृत अमायरा आई-वडील आणि भावंडासोबत राहायची. आई नाझिया हिचा पूर्वी दोघांसोबत घटस्फोट झाल्यानंतर तिने इम्रानसोबत लग्न केले होते. नाझियाला पाच मुले होती. अमायरा ही सगळ्यात लहान होती. ती रात्रीची लवकर झोपत नव्हती. सतत इम्रानचा मोबाइल घेऊन बसायची.
तसेच, ती अनेकदा आपल्या वडिलांची आठवण काढून फोनवर त्यांच्याशी बोलायची व त्यांना भेटण्याचा हट्ट करायची. ती दोघांच्या नात्यात अडसर ठरत असल्याचा समज इम्रानला होता. त्यामुळे त्याने सोमवारी रात्री आठच्या सुमारास अमायराला फिरवून आणण्याच्या बहाण्याने स्वतःसोबत घेतले. भाऊचा धक्का येथे नेत तिचा गळा आवळून हत्या केली आणि मृतदेह समुद्रात फेकून दिल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिसांनी इम्रानला अटक केली.
तक्रारीसाठी पोलिस ठाण्यातहत्येनंतर इम्रानने घर गाठले. अमायरा भेटत नसल्याने आईने सगळीकडे शोध सुरू केला. इम्रानही तिच्या शोधासाठी नाझियासोबत फिरू लागला. नाझियासोबत तक्रारीसाठीही तो पोलिस ठाण्यात आला. मध्यरात्री पोलिस ठाण्यात येऊन मुलगी बेपत्ता असल्याची तक्रारही दिली; मात्र मंगळवारी सकाळी एका मच्छीमाराला अमायराचा मृतदेह ससून डॉकजवळील समुद्रात सापडल्याने शोध थांबला.
१६२ सीसीटीव्ही अन् इमरान जाळ्यातपरिमंडळ चारच्या उपायुक्त आर. रागसुधा यांच्या मार्गदर्शनाखाली अँटॉपहिल पोलिसांनी १६२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून बेपत्ता होण्याआधी अमायरा इम्रानसोबत असल्याची माहिती मिळवली. सतत जागा बदलणाऱ्या इम्रानला अखेर मंगळवारी संध्याकाळी लोअर परळ भागातून ताब्यात घेतले.