Join us  

बांग्लादेशी, पाकिस्तानी मुस्लीम किती याची आकडेवारी द्या; प्रकाश आंबेडकराचं मनसेला आव्हान 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 10:42 AM

तर वंचितच्या आंदोलनाला हिंसक वळण देण्यामागे भाजपा-आरएसएसचा डाव आहे.

मुंबई - नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन देशात वाद पेटलेला असताना आता त्याचे पडसाद राज्यात उमटतानाही पाहायला मिळत आहे. वंचित बहुजन आघाडीकडून आज महाराष्ट्र बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. ठिकठिकाणी वंचितच्या कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको, निषेध केला जात आहे. तर काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. 

सीएएच्या मुद्द्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जे भाष्य केलं त्यावरुन एबीपी माझाशी बोलताना वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. राज ठाकरे भडकविण्याचे काम करत आहे. जर आपण एखाद्या गोष्टीची सत्यता पडताळली असेल तर त्यांनी राज्यात बांग्लादेशी, पाकिस्तानी मुस्लीम किती याची आकडेवारी द्यावी. पुरावे नसताना राजकीय भाषणबाजी करायची याला अर्थ नाही असं विधान त्यांनी केलं आहे. 

तर वंचितच्या आंदोलनाला हिंसक वळण देण्यामागे भाजपा-आरएसएसचा डाव आहे. चेंबूर येथे काही कार्यकर्त्यांकडून बसची तोडफोड करण्यात आली. मात्र हे कार्यकर्ते वंचितचे नव्हते. काहीजण तोंडावर रुमाल बांधून आले होते त्यांनी ही दगडफेक केली. वंचितचे कार्यकर्ते चेहरे लपवून आंदोलन करत नाहीत. आंदोलन बदनाम करण्यासाठी अशाप्रकारचं षडयंत्र केलं जात आहे. पोलिसांनी या चेहरे लपवणाऱ्या लोकांचा शोध घ्यावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. 

सोलापुरात सिटी बसवर दगडफेक करुन काही लोक पसार झाले. पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. वंचित बहुजन आघाडीच्या बंदला काँग्रेस, एमआयएम, माकपसह जिल्ह्यातील १५० संघटनांनी पाठिंबा दिला. बार्शीतील शिवसेनेचे कार्यकर्ते या बंदमध्ये सहभागी झाले आहेत. सकाळच्या सुमाराला बंदला बहुतांश भागात प्रतिसाद मिळाला आहे. शहरातील काही शाळा सुरू आहेत. काही शाळा बंद आहेत.

दरम्यान, देशाच्या व आणि महाराष्ट्राच्या विशिष्ट भागांत अन्य देशांतील मौलवींची ये-जा वाढली आहे. तिथे काय सुरू आहे, याची बाहेरच्यांना कल्पना नाही. मात्र त्यांंना काहीही कल्पना नसली तरी प्रत्यक्षात तिथे काहीतरी भयंकर शिजत असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यामुळे मी स्वत: यासंदर्भात लक्ष घालून याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून याची माहिती देणार असल्याचे राज ठाकरे यांनी भाषणात सांगितलं होतं. 

 

 

टॅग्स :प्रकाश आंबेडकरमहाराष्ट्र बंदमुस्लीमपाकिस्तानबांगलादेश