राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 05:34 IST2025-05-14T05:34:24+5:302025-05-14T05:34:43+5:30
महारेलची निर्मिती करताना राज्याला रेल्वे फाटकमुक्त करण्याचे ध्येय समोर ठेवले होते. राज्यात ३२ पूल पूर्ण केले असून, २०० हून अधिक ठिकाणी काम सुरू आहे.

राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महारेलची निर्मिती करताना आम्ही राज्याला रेल्वे फाटकमुक्त करण्याचे ध्येय समोर ठेवले होते. महारेलने राज्यात ३२ पूल पूर्ण केले असून, २०० हून अधिक ठिकाणी काम सुरू आहे. उत्तम तंत्रज्ञान वापरून त्यांनी गतिशीलतेने काम केले. नागपुरातही १० पुलांचे काम पूर्ण झाले असून, लवकरच त्यांचे लोकार्पण करण्यात येणार आहे, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुंबईतील रे रोड केबल स्टेड ब्रिज व टिटवाळा रोड ओव्हर ब्रिजचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी रात्री लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. रे रोड ब्रिज हा मुंबईतला पहिला केबल स्टेड रोड ओव्हर ब्रिज ठरला आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, अतिशय विक्रमी वेळेत महारेलने रे रोड उड्डाणपूल पूर्ण केला. सन १९१० मध्ये हा पूल उभारण्यात आला होता. या पुलाचे काम करताना वाहतुकीला कमीत कमी अडथळा होईल याची काळजी घेत महारेलने काम पूर्ण केले. केवळ पूल म्हणून न बघता शहराचे मूल्य वाढवणारी वास्तू आहे, असे समजून महारेलचे एमडी राजेश कुमार जयस्वाल यांनी काम केले आहे.
यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार मनोज जामसुतकर, बाल हक्क आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शाह, आ. चित्रा वाघ, आ. प्रवीण दरेकर, आ. प्रा. मनीषा कायंदे, महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल उपस्थित होते.
विशेष आर्किटेक्चरल एलईडी थीम लाइटिंग
मुंबई आणि नागपूर येथे महारेल निर्मित केबल स्टेड उड्डाणपुलावरही दुरून नियंत्रित अशी 'विशेष आर्किटेक्चरल एलईडी थीम लाइटिंग' वापरली गेली आहे. त्यामुळे या उड्डाणपुलाच्या सौंदर्यात भर पडून परिसराची शोभादेखील वाढणार आहे. भविष्यात या पुलांवरील विजेचा खर्च कमी करण्यासाठी (ऊर्जा वापर) महारेल प्रत्येक पुलासाठी पारंपरिक सौरऊर्जेचे नियोजनदेखील करीत आहे.
वाहतूक कोंडी फुटणार
नवीन पूल वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि अधिक कार्यक्षम वाहतूक अनुभव देण्यासाठी महत्त्वाचे ठरतील, असा विश्वास महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल यांनी व्यक्त केला.