Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील २० ‘आयटीआय’मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणार; १५ दिवसांचे प्रशिक्षण मोफत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 09:54 IST

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तीन सामंजस्य करार झाले. मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठकीनंतर कौशल्य विकास विभागाचे सामंजस्य करार करण्यात आले.

मुंबई : राज्यातील २० आयटीआयमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणे, सूक्ष्म आणि लघु उद्योजकांना प्रशिक्षण देण्यासाठी उद्योजक मेळावे आयोजित करून रोजगारनिर्मिती करणे, राज्यातील आयटीआयमध्ये शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या तांत्रिक शिक्षण आणि रोजगार संधी वाढविणे, यासाठी मंगळवारी तीन सामंजस्य करार करण्यात आले. 

कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभाग आणि बंगळुरू येथील श्री श्री ग्रामीण विकास कार्यक्रम ट्रस्ट बंगळुरू, स्नायडर इलेक्ट्रिक इंडिया फाउंडेशन, तसेच पुण्याची देआसरा फाउंडेशन आणि अंधेरी येथील प्रोजेक्ट मुंबई या सामाजिक संस्थांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आले.

मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठकीनंतर कौशल्य विकास विभागाचे सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्रिमंडळातील सदस्य तसेच अधिकारी आणि संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

या कराराच्या माध्यमातून स्नायडर इलेक्ट्रिक इंडिया फाउंडेशन या संस्थेतर्फे येणाऱ्या तीन वर्षांच्या कालावधीत राज्यातील २० शासकीय आयआयटीमधून इलेक्ट्रिशियन या व्यवसायाच्या कार्यशाळांची दर्जा वाढ करण्यात येणार आहे.  

९,७५० प्रशिक्षणार्थ्यांना मिळणार लाभ 

सोलार टेक्निशियन लॅब व इंडस्ट्रियल ऑटोमेशन लॅब उभारून देण्यात येणार आहे. तसेच स्नायडर इलेक्ट्रिक इंडिया फाउंडेशनतर्फे राज्यातील वीजतंत्री व्यवसायाच्या सर्व शिल्प प्रदेशांना बंगळुरू येथे आधुनिक तंत्रज्ञान व सॉफ्ट स्किल्सचे पंधरा दिवसांचे प्रशिक्षण मोफत देण्यात येईल. 

या सामंजस्य करारामुळे पुढील चार वर्षांत टप्प्याटप्प्याने ९,७५० प्रशिक्षणार्थ्यांना इलेक्ट्रिशियन व अक्षय ऊर्जा क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान व इंडस्ट्रियल ऑटोमेशन या विषयातील प्रशिक्षणाचा लाभ होणार आहे.

टॅग्स :आयटीआय कॉलेजशिक्षणशिक्षण क्षेत्रदेवेंद्र फडणवीस