Join us  

"आपण इंग्रजांना पळवून लावलं, तर कोरोना काय चीज आहे; कोरोनालाही पळवून लावू"

By मुकेश चव्हाण | Published: October 11, 2020 4:03 PM

उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आहे.

मुंबई: मुंबई लोकल लवकर सुरु होणार नाही, लोकलची संख्या वाढवण्यावर भर देणार आहोत. ही वाढल्यावर त्यात आणखी लोकांना प्रवास करण्याची परवानगी देऊ, मला गर्दी नकोय, मला कोरोनाचा फैलाव नको आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आहे.

राज्यांतर्गंत रेल्वेची वाहतूक सुरू केली आहे. हळूहळू काही गोष्टी सुरु केल्या आहेत. लोकलसाठी फेऱ्या वाढवण्याची मागणी केली आहे. कारण मला गर्दी नकोय. सगळ्यांनाच लोकलनं जायचंय. लोकलची संख्या वाढल्यानंतर आपण त्यातून अधिक लोकांना प्रवास करण्याची परवानगी देऊ. राज्यांतर्गंत हरिद्वारपर्यंत वाहतूक सुरू झाली आहे, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. तसेच आपण इंग्रजांना पळवून लावलं, तर कोरोना काय चीज आहे. कोरोनालाही आपण पळवून लावू. मात्र त्यासाठी आपल्याला अधिक खबरदारी घ्यायला हवी, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी यावेळी केले.

राज्यातील ७० ते ८० टक्के रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत. तसंच, ज्यांना आरोग्याच्या समस्या आहेत त्यांना कोरोनाचा धोका जास्त आहे. पंरतु त्यांच्यासाठी अनेक सोयीसुविधा राज्य सरकारने उपलब्ध केल्या आहेत, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. त्याचप्रमाणे जे सुरू केलं ते पुन्हा बंद करावं लागू नये म्हणून खबरदारी घ्यावी लागेल. पुन्हा लॉकडाऊन करावा लागणार नाही. याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. ज्या प्रमाणे आतापर्यंत सहकार्य केलं तसं यापुढेही करा, अशी साद उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना घातली.

केंद्रीय कृषी धोरणाबाबत नीट विचार करुन निर्णय घेणार-

शेतकऱ्यांना मी वाऱ्यावर सोडणार नाही, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार, ओल्या दुष्काळाची भरपाई देणार, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. तसेच जोरजबरदस्तीनं कृषी कायदा स्वीकारणार नाही, शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा असेल तरच राज्यात कृषी विधेयकांची अंमलबजावणी करणार, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

आरे मेट्रो कारशेड कांजुरमार्गमध्ये होणार-

 मुंबईतील आरेची 800 एकर जागा जंगल घोषित करण्यात आली आहे. तसेच, आरेमधील प्रस्तावित मेट्रो कारशेड कांजूरमार्गमध्ये करण्यात येणार आहे, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. आधी 600 एकर जागेची घोषणा केली होती. आता या जागेची व्याप्ती वाढवली असून 800 एकरची व्याप्ती करण्यात आली आहे. आता मुंबईत 800 एकराचे जंगल असणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

टॅग्स :उद्धव ठाकरेमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमहाराष्ट्र सरकारकोरोना वायरस बातम्या