Join us
Daily Top 2Weekly Top 5

सीमा देव यांचे निधन मनाला चटका लावून जाणारे; एकनाथ शिंदेंनी वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 15:24 IST

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सीमा देव यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव (Seema Deo) यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं.  त्या ८१ वर्षांच्या होत्या. गेल्या बऱ्याच दिवसांपासून त्या आजारी होत्या. मुलगा दिग्दर्शक अभिनय देव यांच्या वांद्रे येथील घरी आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्या बऱ्याच मोठ्या कालावधीपासून अल्झायमरने ग्रस्त होत्या.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सीमा देव यांना श्रद्धांजली वाहिली आहे. दर्जेदार अभिनयाच्या जोरावर आणि प्रेमळ स्वभावाने चित्रपट सृष्टीत आदराचे स्थान पटकावणाऱ्या चतुरस्त्र अभिनेत्री सीमा देव यांचे निधन मनाला चटका लावून जाणारे आहे, अशा दुःखद भावना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या. 

'भारतीय चित्रपट सृष्टीत रमेश देव आणि सीमा देव यांनी आगळी ओळख निर्माण केली होती. पडद्यावर आणि प्रत्यक्षातही आदर्श दाम्पत्य, प्रेमळ व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचे अनेकांशी स्नेहाचे संबंध राहिले आहेत. देव कुटुंबिय गेली कित्येक दशके कला क्षेत्राची सेवा करत आहे. सीमा देव यांनी अनेक चित्रपटांतून वैविध्यपूर्ण व्यक्तीरेखा साकारून आपल्या चतुरस्त्र अभिनयाचा परिचय दिला आहे. त्यांच्या जाण्याने देव कुटुंबिय आणि चाहत्यांवर आघात झाला आहे. त्यांना यातून सावरण्याची ताकद मिळावी, ही ईश्वरचरणी प्रार्थना करून ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना मुख्यमंत्र्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

सीमा देव या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री आहेत. त्यांनी ८० हून जास्त मराठी आणि हिंदी सिनेमात काम केले आहे. काही कालावधीनंतर त्यांनी हिंदी सिनेमात काम करणे बंद करून केवळ मराठी सिनेइंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केली. आपल्या अभिनय कौशल्याने त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळाच ठसा उमटवला आहे. सीमा देव यांचा जन्म मुंबईतील गिरगाव येथे झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव नलिनी सराफ होते. पुढे त्यांचा विवाह अभिनेते रमेश देव यांच्याशी झाला. २०१३ साली त्यांनी त्यांच्या लग्नाची पन्नाशी साजरी केली होती. अभिनेते अजिंक्य देव आणि दिग्दर्शक अभिनय देव ही त्यांची अपत्यं आहेत.

१९५७ साली सिनेइंडस्ट्रीत केले पदार्पण

१९५७ साली 'आलिया भोगासी' या मराठी चित्रपटाद्वारे सीमा देव यांनी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. या चित्रपटात त्यानी रमेश देव यांच्या बहिणीची भूमिका केली होती. त्यांनी भूमिका साकारलेले जगाच्या पाठीवर, मोलकरीण, यंदा कर्तव्य आहे, या सुखांनो या, सुवासिनी, हा माझा मार्ग एकला हे चित्रपट विशेष गाजले. 'आनंद' या अत्यंत गाजलेल्या हिंदी चित्रपटातील त्यांची भूमिका आजही कायम लक्षात राहते.२०१७ साली पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (पिफमधील) पुरस्कार सोहळ्यात सीमा देव यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

टॅग्स :एकनाथ शिंदेमराठी अभिनेता