Join us  

मीरा भाईंदरमध्ये मेट्रोच्या कामासाठी परदेशातून आणले अत्याधुनिक स्ट्रडल कॅरिअर यंत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 7:46 PM

या यंत्र्याच्या मदतीने आता मेट्रोचे काम जलद आणि सुरक्षित होणार आहे.

मीरारोड - मीरा भाईंदरमध्ये मेट्रोच्या कामासाठी परदेशातून अत्याधुनिक असे स्ट्रडल कॅरिअर यंत्र आणण्यात आले आहे . या यंत्राने कामाचा शुभारंभ आमदार गीता जैन यांच्या हस्ते करण्यात आला. या यंत्रामुळे मेट्रोचे काम वेगाने होणार असून कामातील जोखीम टळून सुरक्षित काम होणार आहे. देशात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या यंत्राचा वापर होत असल्याचे आ. जैन म्हणाल्या. 

दहिसरवरुन पुढे मीरा भाईंदरमध्ये पश्चिमेच्या सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत येणारी मेट्रो ९ चे काम लवकर पूर्ण होऊन मेट्रो प्रत्यक्षात सुरु व्हावी अशी आशा शहरातील नागरिकांना लागून राहिली आहे . मेट्रोचे काम सुद्धा बऱ्यापैकी सुरु आहे. मेट्रोचे खांब उभे राहिले असून त्यावर काँक्रीट कॅप व गर्डर बसवणे हे महत्वाचे आणि जोखमीचे काम सुरु झाले आहे. आता या कामासाठी विदेशातून स्ट्रडल कॅरिअर यंत्र आणण्यात आले आहे . या यंत्राद्वारे कॅप आणि गर्डर बसवण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार गीता जैन यांच्या हस्ते मध्यरात्री उशिरा करण्यात आला. यावेळी एमएमआरडीएच्या कार्यकारी अभियंता योजना पाटील, सुधीर पडीकर, उपअभियंता सचिन कोठावळे, निलेश भदाणे व कंत्राटदार जे. कुमार कंपनीचे सुनील जडीवाल, महेंद्र जैन , अधिकारी सुभ्रतो, अधिकारी - कर्मचारी वर्ग सह शिवसेना जिल्हा प्रमुख प्रभाकर म्हात्रे, नगरसेवक राजू भोईर, अश्विन कासोदिया, विक्रमप्रताप सिंह तसेच नागरिक उपस्थित होते. 

भारतात प्रथमच मीरा-भाईंदर शहरात मेट्रोच्या कामासाठी हे यंत्र वापरण्यात येत आहे. त्याची उंची जवळपास ९४ फुट आहे . या यंत्राचे वजन २८१ टन असून ते १५५ टन वजन उचलते.  सदर यंत्र स्वतःच जाग्यावर चारही बाजूला फिरते यामुळे मेट्रो लाईन पिलर च्या वर यु-गर्डर व कॅपिंग बसवताना मोठा फायदा होऊन काम लवकर होणार आहे. यामुळे काम करताना अपघात होण्याची शक्यता फार कमी आहे. या यंत्रामुळे मेट्रोचे काम करत असताना लोकांना वाहतूक कोंडीचा सामना देखील करावा लागणार नाही असे सांगण्यात आले.  

टॅग्स :मुंबईमीरा-भाईंदरमेट्रो