Join us  

स्टार्टअप्सना मिळणार सरकारचा मदतीचा हात, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2021 6:52 AM

राज्यातील होतकरू तरुणांच्या नवनवीन संकल्पनांवर आधारित स्टार्टअप्सना पेटंट मिळविण्यासाठी राज्य शासनामार्फत १० लाख रुपयांपर्यंत अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे.

मुंबई :  राज्यातील होतकरू तरुणांच्या नवनवीन संकल्पनांवर आधारित स्टार्टअप्सना पेटंट मिळविण्यासाठी राज्य शासनामार्फत १० लाख रुपयांपर्यंत अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे. तसेच स्टार्टअप्सना गुणवत्ता परीक्षण आणि प्रमाणपत्राकरिता २ लाख रुपयांपर्यंतचे अर्थसाहाय्य मिळणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंगळवारी सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे या योजनांचा शुभारंभ करण्यात आला.कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीमार्फत या दोन्ही योजना राबविण्यात येणार आहेत. राज्यात छोटेछोटे उद्योग सुरू करणे गरजेचे असून या माध्यमातूनच राज्यात उद्योग क्षेत्रात मोठे काम होणार आहे. ग्रामीण भागात विविध उद्योगांसाठी आवश्यक कौशल्य प्रशिक्षण दिले गेले पाहिजे. हे लक्षात घेऊन विभागाने काम करावे. सरकारच्या योजनांची अंमलबजावणी वेगाने करून राज्यात समृद्धी आणावी, उत्पादनाचा दर्जा चांगला राखताना उत्पादित मालाच्या विक्रीसाठी बाजारपेठ संशोधनावरही भर देण्यात यावा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या. पेटंटसाठी योजनांचे केले कौतुक !कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विचार व्यक्त केले. क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी कौशल्य विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचे तसेच पेटंटसाठी आज सुरू करण्यात आलेल्या योजनांचे कौतुक केले.

टॅग्स :उद्धव ठाकरेमहाराष्ट्र सरकार