मुंबईतील अनेक रस्त्यांवर ट्रॅफिक पोलिस पाहायला मिळतात. गाडी चालकांवर पोलिस लक्ष ठेऊन असतात. रस्त्यांवर ट्रॅफिक होऊ नये म्हणून प्रयत्न करत असतात. मुंबई पोलिस दिवसरात्र डोळ्यात तेल घालून काम करतात. पण, सध्या एका ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ मुंबईतील ट्रॅफिक पोलिसाचा असल्याचा दावा करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एक ट्रॅफिक पोलिस रिक्षात बसल्याचे दिसत आहे. यामध्ये पोलिस लाच घेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
यामध्ये एक व्यक्ती कॅमेऱ्यावर वाहतूक पोलिसावर लाच घेतल्याचा आरोप करत आहे. यासह त्याच्या नावाच्या प्लेटचा व्हिडीओ देखील बनवत असल्याचे दिसतंय. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई वाहतूक पोलिसांच्या हँडलवरूनही एक प्रतिक्रिया आली आहे. व्हायरल व्हिडीओ १ मिनिटाचा आहे, 'त्या रिक्षा चालकाच्या उजव्या खिशात पैसे असल्याचे दिसत असल्याचा दावा व्हिडीओत केला आहे.
या व्हिडीओमध्ये हा व्यक्ती हिंदीमध्ये बोलत आहे. यामध्ये 'लाच द्या साहेब, तुमच्या हातात पैसे आहेत' असं तो व्यक्ती बोलत आहे. ऑटोच्या समोर बसलेल्या ड्रायव्हरवर आणि मागे बसलेल्या ट्रॅफिक पोलिसावर पैसे घेतल्याचा आरोप करू लागतो. त्याला उत्तर म्हणून ऑटोचालक खिशातून रिकामा हात काढतो आणि दाखवतो आणि म्हणतो 'पैसे नाहीत'. पण तो व्यक्ती त्याच्यावर आरोप करतो आणि म्हणतो 'त्यांनी माझ्यासमोर पैसे घेतले आहेत.'
यानंतर तो वाहतूक पोलिसाच्या गणवेशाच्या नेम प्लेटवरील नाव दाखवतो, यावर त्या पोलिसाचे नाव 'दिनेश युवराज पाटील' असे लिहिलेले दिसत आहे. यानंतर, वाहतूक पोलिस त्याचा फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो व्यक्ती म्हणतो, 'त्याला हात लावू नको, तुम्ही ऑटोमध्ये बसून लाच घेत आहात.' यानंतर, तो माणूस कॅमेरा ऑटो चालकाकडे वळवतो आणि लाचेचे पैसे त्याच्या उजव्या खिशात असल्याचा दावा करतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुंबई वाहतूक विभागाने दखल घेतली
सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर हा व्हिडीओ पोस्ट @gharkekalesh या खात्यावरुन पोस्ट केला आहे. या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, मुंबई, महाराष्ट्रातील वाहतूक पोलिस ऑटो चालकाकडून लाच घेताना पकडले. आतापर्यंत या व्हिडिओला २५ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर पोस्टला ५०० हून अधिक लाईक्स आणि अनेक कमेंट्स मिळाल्या आहेत. दरम्यान, या पोस्टवर मुंबई ट्रॅफिक पोलिसांच्या एक्स खात्यावरुन कमेंट केली आहे. यामध्ये "कृपया आम्हाला संपूर्ण पत्ता देण्याची विनंती आहे.", असं म्हटले आहे.