मिल सुरू करा, नऊ महिन्यांच्या पगारासह थकीत देणी द्या! राष्ट्रीय मिल मजदूर संघाची मागणी; दादरमध्ये आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 09:40 IST2025-12-26T09:40:02+5:302025-12-26T09:40:16+5:30
देशातील ‘एनटीसी’च्या एकूण २३ गिरण्या लॉकडाउनचे कारण पुढे करून बंद करण्यात आल्या. त्याला प्रदीर्घ कालावधी लोटला असला तरी अद्याप या गिरण्या सुरू केल्या नाहीत.

मिल सुरू करा, नऊ महिन्यांच्या पगारासह थकीत देणी द्या! राष्ट्रीय मिल मजदूर संघाची मागणी; दादरमध्ये आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतील बंद असलेल्या एनटीसी मिल सुरू करा, कामगारांचा नऊ महिन्यांचा पगार, रखडलेली देणी विनाविलंब द्या, अशी मागणी राष्ट्रीय मिल मजदूर संघातर्फे करण्यात आली. दादर येथील टाटा मिलवर गिरणी कामगारांनी धडक दिली. यावेळी टाटा मिलसह इंदू मिल क्रमांक ५, पोदार, दिग्विजय या चार एनटीसी गिरण्यांचे कामगार सहभागी झाले होते.
देशातील ‘एनटीसी’च्या एकूण २३ गिरण्या लॉकडाउनचे कारण पुढे करून बंद करण्यात आल्या. त्याला प्रदीर्घ कालावधी लोटला असला तरी अद्याप या गिरण्या सुरू केल्या नाहीत. मुंबईतील एनटीसीच्या चार गिरण्यांसह देशातील २३ बंद गिरण्यांचा लढा उभारून संघटनेने केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे. या प्रश्नावर संघटनेने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. न्यायालयाने कामगारांना पूर्ण पगार देण्याचा निर्णय देऊनही व्यवस्थापनाने त्याची अंमलबजावणी केलेली नाही.
निवृत्ती देसाई यांनी सांगितले की, सरकार सकारात्मक पाऊल जोपर्यंत उचलणार नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही. यापुढे गिरण्यांचा वॉच ॲण्ड वॉर्ड हा सिक्युरिटी स्टाफही या आंदोलनात सहभागी होईल.
अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा निर्णय
गेल्या पाच वर्षांपासून बंद असलेल्या मुंबईतील एनटीसी मिलमधील कामगारांना नऊ महिन्यांपासून पगार दिलेला नाही.
त्यामुळे कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. परिणामी कामगारांमध्ये असंतोष असून, संघटनेकडून अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.