मुंबई - ठाणे आणि मिरा-भाईंदर क्षेत्रातील रहिवाशांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या मेट्रो ९ मार्गिका १५ डिसेंबर पर्यंत तर मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर अखेर सुरू करावे, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. ते या अनुषंगाने मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात बोलावलेल्या बैठकीत बोलत होते. या बैठकीला महानगर विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त अश्विनीकुमार मुदगल, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, मिरा- भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून चालू असलेल्या ठाणे व मिरा- भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये घोडबंदर मार्गाचा भाग असलेल्या कापुरबावडी ते गायमुख या १०.३२ किलोमीटर मार्गाच्या सेवा रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करून मुख्य रस्त्यामध्ये विलीन करण्याचे काम ३१ डिसेंबर अखेर पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. ठाणे व मिरा- भाईंदर महापालिका क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करावी. विशेषतः मिरा -भाईंदर महापालिका हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते महाराणा प्रताप पुतळा दरम्यानच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण जलद गतीने करावे अशी सूचना संबंधित अधिकाऱ्यांना मंत्री सरनाईक यांनी दिल्या.
याबरोबरच मेट्रोच्या पुलाचे काम करत असताना त्याखालील मोकळ्या जागेमध्ये भविष्यात अतिक्रमण होऊन ते विद्रूप होऊ नये, यासाठी नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या धर्तीवर येथे सुशोभीकरण करून उद्याने उभी करावीत. त्या जागांची चांगल्या प्रकारे देखभाल कराता यावी, यासाठी जाहिरातीच्या मोबदल्यात कायमस्वरूपी देखभाल करणाऱ्या संस्था नेमण्यात याव्यात अशी सूचना मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली.
याबरोबरच डोंगरी व मोघरपाडा येथे होणाऱ्या कारशेडच्या प्रकल्पाबाबत देखील या बैठकीमध्ये आढावा घेण्यात आला. तसेच भविष्यात ठाणे व मिरा -भाईंदर शहरात होणाऱ्या मेट्रो स्थानकांना तेथील मूळ गावांची नावे द्यावीत, जेणेकरून तेथे त्या गावची संस्कृती आणि परंपरा या दोन्हीची ओळख निर्माण होईल! असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले.
Web Summary : Minister Sarnaik directed officials to launch Metro 9 and 4 by December. He reviewed Thane and Mira-Bhayandar development projects, including road works and metro station beautification. Original village names should be given to metro stations.
Web Summary : मंत्री सरनाईक ने अधिकारियों को मेट्रो 9 और 4 दिसंबर तक शुरू करने का निर्देश दिया। उन्होंने सड़क कार्यों और मेट्रो स्टेशन सौंदर्यीकरण सहित ठाणे और मीरा-भायंदर विकास परियोजनाओं की समीक्षा की। मेट्रो स्टेशनों को मूल गांव के नाम दिए जाने चाहिए।