Join us  

राज्यातील बससेवा सुरू करा, वंचितचं 'डफली बजाव' आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 10:01 AM

राज्यातील एसटी सेवा व महानगरातील सार्वजनिक बससेवा सुरू झाल्याच पाहिजे, या प्रमुख मागणीला घेऊन वंचितकडून हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

मुंबई - राज्यात मिशन बिगेन अगेन सुरु झालं असून अद्यापही जिल्हाबंदी, शाळ, महाविद्यालये आणि सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी आहे. त्यामुळे, अनलॉकमध्येही बरंच काही लॉक असल्याने अनेकांचे रोजगार बुडत आहेत. नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे, वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली असून येत्या १२ ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यात डफली बजाव आंदोलन करण्यात येणार आहे. डफली वाजवून महाविकास आघाडी सरकारला जाग आणण्याचं काम वंचित बहुजन आघाडीकडून होणार आहे. 

राज्यातील एसटी सेवा व महानगरातील सार्वजनिक बससेवा सुरू झाल्याच पाहिजे, या प्रमुख मागणीला घेऊन वंचितकडून हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. एसटी सेवा बंद असल्याने कामगारांची उपासमार होत आहे, तर दुसरीकडे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्यापही बंद आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. या बससेवा तात्काळ सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी आंबेडकर यांनी केली आहे. त्यासाठी, 12 ऑगस्ट रोजी राज्यातील एसटी डेपो व शहरातील सार्वजनिक बस डेपोसमोर दिवसभर डफली वाजवून सरकारचा निषेध नोंदविण्यात येईल. 

वंचितच्या या आंदोलनात कष्टकरी आणि रोजगार बुडालेल्या जनतेनं सामिल व्हावं, असं आवाहन वंबआकडून करण्यात आलंय. व्यापारी, रिक्षा, दुकानदार, फेरीवाले, लोहार, न्हावी, चांभार इ. संघटनांना भेटून या आंदोलनात सामील होण्याची विनंती करावी, असेही आंबेडकर यांनी सूचवलंय. दरम्यान, राज्यातील सार्वजनिक वाहतूक आणि बससेवा कधी सुरु होणार हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. त्यामुळे, सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहान करावा लागत आहे.  

टॅग्स :वंचित बहुजन आघाडीप्रकाश आंबेडकरबसचालककोरोना वायरस बातम्या