Kunal Kamra New Song: स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वादग्रस्त गाणं गायल्याने तो वादात सापडला आहे. खार येथील एका क्लबमध्ये कुणाल कामराने ठाणे की रिक्षा असं विडंबनात्मक गाणं गाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली होती. हे गाणं समोर आल्यानंतर संतप्त शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी जिथे कुणाल कामराने शो केला होता त्या क्लबची तोडफोड केली. त्यानंतर कामराने ही तोडफोड योग्य नसल्याची प्रतिक्रिया दिली होती. मात्र आता कुणाल कामराने पुन्हा एका शिंदेंच्या शिवसैनिकांना डिवचलं आहे. कामराने आणखी एक गाण्याचा व्हिडीओ पोस्ट करुन क्लबमधल्या तोडफोडीवर भाष्य केलं आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील वादग्रस्त गाण्यावरुन राज्यभरात कुणाल कामराविरोधात आंदोलन करण्यात आलं. कुणाल कामरावर कठोर कारवाई करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी खार येथील युनीकॉन्टिनेंटल हॉटेलमधील द हॅबिटॅट क्लबची तोडफोड देखील केली. त्यानंतर आता या तोडफोडीवरुन कुणाल कामराने नवं गाणं पोस्ट केलं आहे. या गाण्यामधून त्यांने शिंदे गटाच्या शिवसैनिकांना लक्ष्य केलं आहे.
"माझ्यात सहन करण्याची ताकद..."; कुणाल कामरा प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं भाष्य
भारताचे आणखी एक राष्ट्रगीत म्हणत कुणालने हे गाणं गायलं. "हम होंगे कंगाल एक दिन, मन में है अंधविश्वास, देश का सत्यानाश. होंने नगे चारों ओर, करेंगे दंगे चारों ओर पुलिस के पंगे चारों ओर. एक दिन मन में नथूराम, हरकतें आसाराम. हम होंगे कंगाल एक दिन," असं गाणं कुणाल कामराने गायलं.
गाण्याच्या व्हिडीओमध्ये शिंदे गटाचे शिवसैनिक क्लबची तोडफोड करताना दिसत आहेत. तर काहीजण कामराच्या पुतळ्यासोबत तर काही त्याच्या फोटोसोबत दिसत आहे. व्हिडीओमध्ये शिवसेना नेते राहुल कनाल यांचेही फुटेज वापरुन त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल माफी मागणार नसल्याचे कुणाल कामराने म्हटलं आहे. कुणाल कामराने य सोमवारी एक पोस्ट करून कॉमेडी शोचे रेकॉर्डिंग झालेल्या क्लबच्या तोडफोडीवरुन टीका केली.