Join us
Daily Top 2Weekly Top 5

मिठीबाई कॉलेजात चेंगराचेंगरी, मद्यधुंद तरुणांमुळे उडाला गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2018 00:01 IST

चेंगराचेंगरीमुळे सर्व विद्यार्थ्यांच्या छातीला दुखापत झाली आहे.

मुंबई - येथील मिठीबाई कॉलेजमध्ये चेंगराचेंगरीचा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे कॉलेजमध्ये एकच गोंधळ उडाला. या दुर्घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाले असून तीन विद्यार्थ्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे. डेव्हीड बंगेरा या 20 वर्षीय विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर आरएन कुपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

चेंगराचेंगरीमुळे सर्व विद्यार्थ्यांच्या छातीला दुखापत झाली आहे. डेव्हिड या विद्यार्थ्याच्या छातीतील बरगड्यांना मेजर फ्रॅक्चर  झाले आहे. डिव्हाईन हे गायक आपला बँड परफॉर्म करण्यासाठी महाविद्यालयात आले होते. सध्या कॉलेजमध्ये वार्षिक फेस्टीव्हल सुरू आहे. त्या, दरम्यान ही दुर्घटना घडली. डेविड बंगेरा, शदाब शेख़, निखिल पवार, कुणाल चव्हाण, हितेश कांबले, मैक्स डिसूज़ा, कल्याणी अग्रवाल, पृथा वेतस्कर अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत. 

कॉलेजच्या बीएमएस विभागाचा फेस्टिवल गुरुवारपासून सुरु झाला होता. या फेस्टिवल अंतर्गत गुरुवार संध्याकाळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांची गर्दी वाढली. मिठीबाई कॉलेजमधील फेस्टिवल पाहण्यासाठी स्थानिक मुलांनी घुसखोरी केल्यामुळे ही चेंगराचेंगरी झाल्याचा दावा महाविद्यालयातील काहींनी केला आहे. तर, मिठीबाई महाविद्यालय प्रशासनाने चेंगराचेंगरी असल्याचा दावा फेटाळला. महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी असलेल्या कार्यक्रमात इतर मुलांचा सहभाग आल्याने सिक्युरिटीने त्यांना अडवले, त्यामुळे धक्काबुकी होऊन हा प्रकार घडल्याचे मिठीबाई महाविद्यालयाचे प्राचार्य राजपाल हांडे यांनी सांगितले. दरम्यान, हा प्रकार घडल्यावर कार्यक्रम बंद करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. तर, कोणताही चेंगराचेंगरीचा प्रकार घडला नसून किरकोळ जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची प्रकृती आता स्थिर आहे, असे जुहूचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ वाव्हळ यांनी सांगितले आहे. 

महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारातून बळजबरी कार्यक्रम पाहण्यासाठी शिरकाव करणाऱ्या मुलांपैकी।काहीनी मद्यपान केलेल्या अवस्थेत होते. यामुळेच गेट वरून उडी मारताना ते विद्यार्थी जखमी झाले आहेत, असे पोलीस सुत्रांचे म्हणणे आहे

टॅग्स :मुंबईमहाविद्यालयविद्यार्थीहॉस्पिटल