Join us  

कोरोनाच्या भीतीने कर्मचारी गैरहजर, एसटीच्या फेऱ्या कमी झाल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2020 6:45 PM

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे प्रवास करताना हाल

 मुंबई : कोरोनाचा शिरकाव एसटी महामंडळात झाल्याने एसटीच्या अत्यावश्यक सेवेतील फेऱ्यावर झाला आहे. एसटीतील कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्यांची संख्या वाढत असल्याने अनेक कर्मचारी कामावर येण्यास तयार नाहीत. परिणामी, बुधवारी, मुंबई विभागात फक्त ५४ फेऱ्या धावल्या आहेत. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या पोलीस, वैद्यकीय कर्मचारी, मंत्रालयातील कर्मचारी यांना प्रवास करताना अडचणी आल्या. 

मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला नेहरू, पनवेल, उरण या आगारातून बुधवारी फक्त ५४ फेऱ्या धावल्या. यातून १ हजार ११७ प्रवाशांचा प्रवास झाला, अशी माहिती एसटी महामंडळातून मिळाली. फेऱ्या कमी झाल्याने अनेक प्रवासी बस थांब्यावर एसटीचे वाट बघत राहिले होते. एसटी येत नसल्याने अनेकांनी पर्यायी सेवेतून प्रवास केला.मुंबई विभागातून एसटी बसच्या दररोज सुमारे ८०० फेऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी धावत होत्या. मात्र या फेऱ्या हळूहळू कमी होत ५४ वर आल्या आहेत. मुंबई विभाग, ठाणे विभाग , मुंबई मध्यवर्ती कार्यालयालयात कोरोना रुग्ण वाढले आहेत. या विभागातून चार जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. परिणामी, एसटी कर्मचाऱ्यामध्ये भीतीचे वातावरण आहे. एसटी कर्मचारी कामावर येण्यास काचकूच करत आहेत. बुधवारी, फक्त २० टक्के कर्मचारी कर्तव्यावर होते.  येत्या दिवसात कोरोनाग्रस्त रुग्ण वाढत गेल्यास एसटीची सेवा बंद होण्याची भीती कर्मचारी संघटनेकडून व्यक्त करण्यात आली आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसलॉकडाऊन अनलॉक