Join us  

ST कर्मचाऱ्यांचा संप मिटणार? मंत्री अनिल परबांसोबतची बैठक संपली, थोड्याच वेळात निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 6:30 PM

सरकारच्या चर्चेची दार उघडी आहेत. एसटी खूप नुकसानात आहेत त्यामुळे संप मागे घ्यावा असं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब(Anil Parab) यांनी केले.

मुंबई – गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात ST महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि एसटीचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण अशा प्रमुख मागण्यांसाठी कर्मचारी आग्रही आहे. आझाद मैदानावर राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी कुटुंबासह ठिय्या आंदोलन हाती घेतले आहे. या संपावर तोडगा काढण्यासाठी सर्वच पातळीवर चर्चा सुरु आहे. आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखालील एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची चर्चा केली.

या बैठकीबाबत गोपीचंद पडळकर म्हणाले की, आजच्या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. अद्याप संप मागे घेतला नाही. १२ आठवड्यांची मुदत कमी करण्यासाठी सरकारने सकारात्मकता दाखवली आहे. समितीचा अहवाल येत नाही, तोवर सरकार काही करू शकत नाही, अस सरकारच म्हणणं आहे. आम्ही आता आझाद मैदानावर जाऊन चर्चा करू, आम्हालाही संप ताणायचा नाही. ठराविक वेळ द्या. विलीनीकरण हा महत्वाचा विषय आहे, त्यामुळे निलंबनाची चर्चा नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांना काय वाटतं याला मी काडीची किंमत देत नाही असा टोला पडळकर यांनी लगावला.

तर एसटी कर्मचारी संपावर तोडगा काढण्यासाठी आज बैठक झाली. विलीनीकरनाची मागणी त्यांची आग्रही होती. पण, ती मान्य होऊ शकत नाही कारण हे प्रकरण कोर्टात आहे. १२ आठवड्याचा कालावधी कमी करण्याची मागणी झाली.  त्यावर कालावधी कमी करून अहवाल लवकर देण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन दिले. सकारात्मक अहवाल आला तर काही करू शकत नाही पण, नकारात्मक अहवाल आला तर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याची मागणीवर विचार करून निर्णय घेण्यास सरकार सकारात्मक आहे. आता ते कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्यास गेले आहे. सरकारच्या चर्चेची दार उघडी आहेत. एसटी खूप नुकसानात आहेत त्यामुळे संप मागे घ्यावा असं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब(Anil Parab) यांनी केले.

राज ठाकरेंनी घेतली होती शरद पवारांची भेट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thakceray) यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. या भेटीत एसटी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळही होते. शरद पवारांनीही या मुद्द्यावर सकारात्मक भूमिका घेतली. त्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी शरद पवारांची भेट घेतली. एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावर सुवर्णमध्य साधावा अशी सूचना पवारांनी परिवहन मंत्र्यांना दिली. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा संप लवकरच संपेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :अनिल परबएसटी संपगोपीचंद पडळकर