Join us  

ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांना मोठी पगारवाढ, श्रेणीनुसार कुठल्या कर्मचाऱ्याला किती पगार मिळणार, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 7:28 PM

ST Workers Strike: परिवहन मंत्री Anil Parab यांनी केलेल्या घोषणेनुसार कर्मचाऱ्यांना ४१ टक्क्यांपर्यंत तसेच कमाल ५ हजारांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, परिवहन मंत्र्यांनी सेवेनुसार कर्मचाऱ्यांच्या केलेल्या वर्गवारीनुसार प्रत्येक एसटी कर्मचाऱ्याला किती पगारवाढ मिळणार आहे याचा घेतलेला हा आढावा.

मुंबई - गेल्या पंधरवड्यापासून राज्यात एसटीच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. दरम्यान, एसटी महामंडळाच्या राज्य सरकारमधील विलिनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचारी अडल्याने या संपामध्ये निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांना भरघोस पगारवाढ देण्याची घोषणा केली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलेल्या घोषणेनुसार कर्मचाऱ्यांना ४१ टक्क्यांपर्यंत तसेच कमाल ५ हजारांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, परिवहन मंत्र्यांनी सेवेनुसार कर्मचाऱ्यांच्या केलेल्या वर्गवारीनुसार प्रत्येक एसटी कर्मचाऱ्याला किती पगारवाढ मिळणार आहे याचा घेतलेला हा आढावा.

परिवहनमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार नव्याने सेवेत आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये ठोक पाच हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचा पगार आता १२ हजार ८० रुपयांवरून १७ हजार ३९५ रुपयांपर्यंत वाढणार आहे. तसेच सर्व भत्ते धरून अशा कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुमारे ७ हजार २०० रुपयांची वाढ होणार आहे.

ज्या कर्मचाऱ्यांची सेवा ही १० वर्षांदरम्यान, झालेली असेल, त्यांच्या वेतनामध्ये राज्य सरकारने चार हजार रुपयांची वाढ होणार आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये सर्व भत्ते मिळून पाच हजार ७६० रुपयांची वाढ होणार आहे.

तसेच ज्या कर्मचाऱ्यांची सेवा ही २० वर्षे झालेली असेल, त्यांचे वेतन अडीच हजार रुपयांनी वाढवण्यात येणार आहे. त्यांच्या वेतनामध्ये सर्व भत्ते मिळून ३ हजार ६०० रुपयांची वाढ होणार आहे.

तर ज्या कर्मचाऱ्यांची सेवा ही ३० वर्षे झालेली असेल. त्यांच्या वेतनामध्येही अडीच हजार रुपयांनी वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व भते मिळून त्यांचे वेतन सुमारे ३ हजार ६०० रुपयांनी वाढणार आहे. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांना एसटीचे उत्पन्न वाढल्यास इन्सेंटिव्ह वाढवण्याचा निर्णयही परिवहन मंत्र्यांनी जाहीर केला आहे.  

टॅग्स :एसटी संपअनिल परबमहाराष्ट्र सरकार