लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : एसटी प्रवाशांना भविष्यात सुरक्षित प्रवासाबरोबरच वक्तशीर सेवा देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या स्मार्ट बस घेण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
नवीन तीन हजार बस खरेदीच्या पार्श्वभूमीवर बस बांधणी कंपन्यांसोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर व संबंधित खातेप्रमुखांसह बस बांधणी कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी सरनाईक म्हणाले, ‘नवीन सर्व बसमध्ये ‘एआय’वर आधारित कॅमेरे, जीपीएस, एल. ई. डी. टीव्ही, वाय-फाय, चालक ब्रेथ ॲनालाइज यंत्रणा, चोरी - प्रतिबंध तंत्रज्ञानावर आधारित बस लॉक सिस्टम, असे अत्याधुनिक तंत्रज्ञान असेल. चालकाच्या बस चालविण्याच्या पद्धतीवरही कॅमेरा लक्ष ठेवणार आहे. बसस्थानक व परिसरात पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या बस पूर्णतः बंद राहतील, अशी यंत्रणा बसमध्ये बसविण्यात येईल.’