एसटीचे स्मार्ट कार्ड नापास, प्रवाशांच्या हाती कागदीच पास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 12:23 IST2025-08-10T12:22:59+5:302025-08-10T12:23:24+5:30

गेल्या काही महिन्यांपासून यंत्रणा पडली बंद

ST Smart Card scheme system is currently closed | एसटीचे स्मार्ट कार्ड नापास, प्रवाशांच्या हाती कागदीच पास

एसटीचे स्मार्ट कार्ड नापास, प्रवाशांच्या हाती कागदीच पास

मुंबई : राज्य मार्ग परिवहन (एस.टी.) महामंडळाच्या बसमधून सवलतीत प्रवास करणारे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांसाठी कागदी ओळखपत्राला पर्याय म्हणून 'स्मार्ट कार्ड' योजना जाहीर करण्यात आली होती. परंतु, ही यंत्रणा सद्य:स्थितीत बंद असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. परिणामी ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांच्या हाती पुन्हा कागदी पास, ओळखपत्र पाहायला मिळत आहेत.

'स्मार्ट कार्ड'मध्ये 'रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन' (आरएफआयडी) तंत्रज्ञानाचा वापर केला होता. या माध्यमातून तिकिटे आणि सवलत पडताळणी सुलभ करण्यासाठी वापरले जाणार होते.

हे कार्ड शहरात तसेच जिल्हा आणि तालुक्यांच्या ठिकाणी असलेल्या आगारात, बस स्थानकामध्ये उपलब्ध करून दिले होते. मात्र, या योजनेला काही महिन्यांपासून ब्रेक लागला आहे.

सवलतींचा ३० पेक्षा अधिक घटकांना लाभ

एसटी महामंडळाकडून प्रवासात विविध सवलती दिल्या जातात. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी अशा ३० पेक्षा अधिक घटकांना याचा लाभ मिळतो. दरम्यान, याचा लाभ घेण्यासाठी बनावट प्रमाणपत्र, ओळखपत्राच्या आधारे प्रवास करणाऱ्यांना रोखण्यासाठी महामंडळाने 'स्मार्ट कार्ड योजना' जाहीर केली होती; परंतु, 'स्मार्ट कार्ड' संगणक प्रणालीसाठी नेमलेली कंपनी ती यंत्रणा व्यवस्थित सांभाळू शकलेली नाही. त्यामुळे आता ही योजना पूर्ती रखडली आहे.

बनावट ओळखपत्र? 

प्रवासादरम्यान वाहकाला दाखविण्यात येणारे प्रमाणपत्र खरे आहे का, याची पडताळणी करण्याची कुठलीही यंत्रणा नाही. मार्ग तपासणी पथकाला संशय आला तर अशा प्रवाशांची चौकशी केली जाते.

'आधार कार्ड'वर ज्येष्ठांचा प्रवास

महामंडळाच्या लालपरी बसमधून सवलतीत प्रवास करणाऱ्या ६५ वर्षे आणि ७५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठांच्या हाती आता आधार कार्ड आहे. 

सध्या महामंडळाच्या बसमधून सवलतीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडे 'आधार कार्ड' मागितले जात आहे. वयाचा पुरावा म्हणून ते ग्राह्य धरले जात आहे. मात्र, हे खरे की खोटे याची पडताळणी करणे शक्य होत नाही.

Web Title: ST Smart Card scheme system is currently closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई