सेंट जॉर्जेसला लिव्हर ट्रान्सप्लांटचा परवाना; रुग्णालयातील डॉक्टरांना शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 05:46 IST2025-07-12T05:45:37+5:302025-07-12T05:46:13+5:30

लिव्हर ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रिया, जटिल शस्त्रक्रिया करण्याकरिता निवडक परिचारिकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

St. George hospital receives liver transplant license; hospital doctors undergo surgical training | सेंट जॉर्जेसला लिव्हर ट्रान्सप्लांटचा परवाना; रुग्णालयातील डॉक्टरांना शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण

सेंट जॉर्जेसला लिव्हर ट्रान्सप्लांटचा परवाना; रुग्णालयातील डॉक्टरांना शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध सेंट जॉर्जेस रुग्णालयात आता लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याचा अर्थात यकृत प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियांचा मार्ग मोकळा होणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचा प्रत्यारोपण शस्त्रक्रियांसाठी बंधनकारक असलेला परवाना सेंट जॉर्जेस रुग्णालयाला मिळाला आहे. मात्र, आता लिव्हर ट्रान्सप्लांट केव्हा सुरू होईल हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

गेल्या काही वर्षांत लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढले आहे. खासगी रुग्णालयात या शस्त्रक्रियांसाठी होणारा खर्च गरीब रुग्णांना परवडत नसल्याने शासकीय रुग्णालयातही या शस्त्रक्रिया सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता. मात्र, त्यासाठी पायाभूत सुविधा, मनुष्यबळ कसे निर्माण करायचे? आवश्यक खर्चाची जुळवाजुळव करावी लागणार होती. वैद्यकीय शिक्षण विभागाने त्यासाठी जे. जे. रुग्णालयाच्या अखत्यारीतील सेंट जॉर्जेस रुग्णालयाची निवड केली. त्या ठिकाणी या शस्त्रक्रिया करण्याच्या उद्देशाने आधीच अतिदक्षता विभाग बनविण्यात आला होता. मात्र, त्यात फारशी प्रगती झालेली नव्हती. तसेच लिव्हर ट्रान्सप्लांट करण्यासाठी आरोग्य विभागाकडे आवश्यक असणारी परवानगी मागण्यात आली होती.

रुग्णालयातील डॉक्टरांना शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण 
सेंट जॉर्जेसच्या रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या या ठिकाणी लिव्हर क्लिनिक सुरू करण्यात येणार आहे. तसेच लिव्हरशी संबंधित शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच सुरुवातीच्या काळात या लिव्हर ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी खासगी रुग्णालयातील डॉक्टरांची मदत घेणार आहे. या शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण रुग्णालयातील डॉक्टरांना देण्यात येणार आहे. त्यासोबत लिव्हर ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रिया, जटिल शस्त्रक्रिया करण्याकरिता निवडक परिचारिकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

आमच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सेंट जॉर्जेस रुग्णालयात लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याविषयी सूचना केल्या होत्या. त्यासाठी आवश्यक निधीस मंजुरी दिली होती. या लिव्हर ट्रान्सप्लांटसारख्या शस्त्रक्रिया करण्याकरिता आरोग्य विभागाची परवानगी आवश्यक असते. अखेर ती परवानगी मिळाली आहे. त्यानंतर काही ठिकाणी झेडटीसीसी, सोटो या संस्थांबरोबर संलग्नीकरण करून घ्यावयाची प्रक्रिया लवकरच पार पाडण्यात येणार आहे. त्यासोबत ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेटर यांनासुद्धा प्रशिक्षण देण्यात येणार आहे - डॉ. अजय भंडारवार, अधिष्ठाता, सर जे जे रुग्णालय

Web Title: St. George hospital receives liver transplant license; hospital doctors undergo surgical training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.