Join us

एसटीची १५ दिवसांत ३२८ कोटींची कमाई; भाऊबीजेला ३१ कोटींचे विक्रमी उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 09:07 IST

भाडेवाढ होऊनही अधिकाधिक प्रवासी एसटीला भरभरून प्रतिसाद देत आहेत.

मुंबई : राज्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटी बसने गेल्या १५ दिवसांत घसघशीत ३२८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. दिवाळीत भाऊबीजेच्या दिवशी तर तब्बल ३१ कोटी ६० लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न एसटीने मिळविले. 

दिवाळीच्या निमित्ताने वाढणारी प्रवासी वाहतूक लक्षात घेत ८ नोव्हेंबरपासून एसटी महामंडळाने दहा टक्क्यांची हंगामी भाडेवाढ केली आहे. त्याशिवाय ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास, महिलावर्गाला ५० टक्के तिकीट सवलत या योजना एसटीने राबविल्या आहेत. त्यामुळे भाडेवाढ होऊनही अधिकाधिक प्रवासी एसटीला भरभरून प्रतिसाद देत आहेत. त्याचीच पोचपावती म्हणून एसटी महामंडळाने १ ते १५ नोव्हेंबर या काळात ३२८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. योग्य पद्धतीने केलेले गाड्यांचे नियोजन आणि वर्षभरात आलेल्या नवीन गाड्यांचा ताफा यामुळे भाऊबीजेच्या दिवशी १४,६७७ बसगाड्या राज्यातील सर्व मार्गांवर धावल्या. या एका दिवसात महामंडळाने ३१ कोटी ६० लाखांचा महसूल मिळविला.

भाऊबीजेला ५० लाख किमी धाव भाऊबीजेच्या दिवशी एसटी महामंडळाने गाड्यांचे नियोजन केले होते. बुधवारी साडेचौदाहून अधिक गाड्या रस्त्यावर होत्या. या सर्व गाड्यांची बुधवारी एका दिवसात ५० लाख किमीचे अंतर कापले आहे. 

या विभागांनी ओलांडला दहा कोटींचा टप्पा छत्रपती संभाजीनगर- ११.३४ कोटी बीड - ११.१५ कोटी धाराशिव - ११.११ कोटी रत्नागिरी - १२.०३ कोटीठाणे - १३.६७ कोटीकोल्हापूर - १६.८० कोटी पुणे - २१.४४ कोटीसांगली - १६.०५ कोटीसातारा - १२.५७ कोटीसोलापूर - १४.७३ कोटीअहमदनगर - ११.८२ कोटीधुळे - १७.१९ कोटीजळगाव - १७.४१ कोटीनाशिक - १६.८९ कोटी

एसटी महामंडळाला प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. गेल्या १५ दिवसांत ३२८ कोटींचे उत्पन्न मिळाले. या  यशात एसटीचे चालक, वाहक आणि यांत्रिकी कर्मचारी आणि सर्व वर्गातील कर्मचारी यांचे मोलाचे योगदान आहे. गाड्यांची देखभाल-दुरुस्ती, योग्य नियोजन, शिस्तबद्ध अंमलबजावणी यामुळे हे शक्य झाले आहे. एसटीला पसंती देणाऱ्या प्रवाशांचे  खूप खूप आभार.  - शेखर चन्ने,  उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

टॅग्स :दिवाळी 2023महाराष्ट्र