लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एसटी) प्रतिलिटर ३० पैसे स्वस्त दरामध्ये डिझेल मिळणार असल्याने महामंडळाची वार्षिक ११ कोटी ८० लाखांची बचत होणार आहे. ही सवलत १ ऑगस्टपासून लागू होणार आहे. पारंपरिक पुरवठादार कंपनीकडून सवलत दरात सूट देण्यास नकार दिल्यानंतर डिझेलच्या खरेदीसाठी स्पर्धात्मक निविदा काढण्याची परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी तयारी दाखवली. त्यांच्या या व्यावसायिक दृष्टिकोनामुळे महामंडळाला फायदा झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
एसटी महामंडळ सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांकडून गेली ७० वर्षापेक्षा अधिक काळ डिझेल इंधन खरेदी करते. महामंडळाला सध्या दररोज सरासरी १० लाख ७७ हजार लिटर डिझेल लागते. मोठा ग्राहक असल्यामुळे संबंधित कंपन्यांकडे प्रतिलिटर सवलत दरात वाढ करण्याची विनंती करण्यात आली होती. परंतु कंपन्यांनी त्याला दाद न दिल्याने सरनाईक यांनी या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तीन-चार बैठका घेण्यात आल्या. त्यानंतर डिझेल इंधन पुरवठा करणाऱ्या इतर खासगी कंपन्यांसोबत वाटाघाटी करत एसटीने निविदा काढण्याचा निर्णय घेतला होता.
परिणामी या कंपन्यांनी सवलत दरात वाढ करण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार येत्या १ ऑगस्ट पासून डिझेल प्रतिलिटर ३० पैसे कमी करण्याचे संबंधित कंपन्यांनी मान्य केले असल्याचे महामंडळ अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या एसटीच्या ताफ्यात १४ हजारांपेक्षा जास्त बस आहेत. येत्या काळामध्ये बसच्या संख्येत वाढ करण्यात येणार असल्याने डिझेलचा खप वाढणार आहे. प्रतिलिटर ३० पैसे वाढीव सवलत दिल्यामुळे एसटी महामंडळाची दिवसाला सरासरी ३ लाख २३ हजार रुपयांची आणि वर्षाकाठी अंदाजे ११ कोटी ८० लाखांची अतिरिक्त बचत होणार आहे.
एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक असल्याने शक्य त्या ठिकाणी बचत करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. तिकीट विक्रीच्या व्यतिरिक्त उत्पन्नाचे इतर स्रोत देखील निर्माण करणे गरजेचे आहे. या प्रयत्नांमुळे एसटीला आर्थिक सक्षम करण्यात मदत होईल. - प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष.