Join us

फुकट्या प्रवाशांकडून एसटीने वसूल केला २१ लाखांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 06:31 IST

ST Bus: राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाने एप्रिल २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून २१ लाख ३५ हजार २९१ रुपयांचा दंड वसूल केला आहे. एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली.

मुंबई - राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाने एप्रिल २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून २१ लाख ३५ हजार २९१ रुपयांचा दंड वसूल केला आहे. एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली असून, त्या माध्यमातून ही कारवाई केली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

एसटी महामंडळाच्या राज्यभर हजारो सेवा चालविल्या जातात. यामध्ये लांब पल्ल्याच्या गाड्यांसह ग्रामीण भागांमध्ये टप्पे वाहतूक देखील केली जाते. एसटीचा १ टप्पा ६ किमीचा असून, एसटीचे प्रतिटप्पा भाडे ११ रुपये आहे. मात्र, अनेकदा प्रवासी तिकीट न काढता किंवा चुकीचे तिकीट घेऊन प्रवास करतात. अशा प्रवाशांकडून प्रवास केलेल्या अंतराचे भाडे आणि दंड आकारण्यात येतो. गेल्या दहा महिन्यांच्या कालावधीत एसटी महामंडळाच्या एकूण ११ लाख ७ हजार ६५१ गाड्यांची तपासणी केली असून, त्या माध्यमातून ६ हजार प्रवाशांना दंड आकारण्यात आला आहे.

असा आकारला जातो दंडएखाद्या प्रवाशाने विनातिकीट प्रवास केला तर त्याच्याकडून प्रवास केलेल्या अंतराचे भाडे पन्नास रुपयांपेक्षा कमी होत असेल तर एकूणच १०० रुपये दंड, तसेच जर भाडे ५० रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्या अंतराचे भाडे अधिक तितकीच रक्कम दंड म्हणून आकारली जाते. या सर्व दंडावर १८ टक्के जीएसटी देखील आकारला जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

- तपासलेल्या एकूण गाड्या - ११,०७,६५१- वसूल केलेले भाडे - ८ लाख ५० हजार ९०४ रुपये- वसूल केलेला दंड - १० लाख २७ हजार ६७० रुपये- विनातिकीट प्रवासी - ६ हजार २९७

टॅग्स :एसटीमुंबई