एसटी बसचा ‘आवडेल तिथे प्रवास’ स्वस्त; राज्यात कुठेही करता येणार प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 12:58 IST2025-10-13T12:58:12+5:302025-10-13T12:58:37+5:30
एसटीचा चार किंवा सात दिवसांचा पास घेतल्यावर प्रवाशांना दरवेळी तिकीट काढण्याची आवश्यकता नसते. एसटी प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

एसटी बसचा ‘आवडेल तिथे प्रवास’ स्वस्त; राज्यात कुठेही करता येणार प्रवास
मुंबई : राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाने दिवाळीच्या अगोदर आवडेल तेथे प्रवास योजनेच्या पासमध्ये कपात करून प्रवाशांना खुशखबर दिली आहे. ही कपात ७ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू केली आहे. यामध्ये २० ते २५ टक्के कपात केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
‘आवडेल तेथे प्रवास’ योजना ही एसटी महामंडळाची लोकप्रिय योजना असून, या योजनेअंतर्गत प्रवाशांना एकाच पासवर राज्यातील कुठेही अमर्याद प्रवास करण्याची सुविधा मिळते. प्रवाशांना एकाच पासवर राज्यातील कोणत्याही लालपरी, सेमीलक्झरी, शिवशाही बसने अमर्याद प्रवास करण्याची मुभा मिळते.
एसटीचा चार किंवा सात दिवसांचा पास घेतल्यावर प्रवाशांना दरवेळी तिकीट काढण्याची आवश्यकता नसते. एसटी प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पाससाठी अट काय ?
एसटीच्या योजनेअंतर्गत प्रौढ पासधारकास ३० किलो व १२ वर्षांखालील मुलास १५ किलो प्रवासी सामान मोफत नेता येते. प्रवाशांचा पास हरविल्यास त्याऐवजी दुसरा पास देण्यात येत नाही.
प्रवासादरम्यान तो जपून ठेवणे आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच हा पास दुसऱ्या प्रवाशाला देऊन त्याचा गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास तो जप्तदेखील केला जात असल्याचे ते म्हणाले.
अशी आहे सवलत ( दर रुपयांमध्ये )
चार दिवसांचे पास
बस प्रकार जुने दर सुधारित दर
(प्रौढ/मुले) (प्रौढ/मुले)
साधी, जलद, रात्रसेवा १८१४ / ९१० १३६४ / ६८५
शिवशाही (आंतरराज्य) २५३३/१२६९ १८१८ / ९११
१२ मीटर ई बस (ई शिवाय) २८६१ / १४३३ २०७२ / १०३८
सात दिवसांचे पास
बस प्रकार जुने दर सुधारित दर
(प्रौढ/मुले) (प्रौढ/मुले)
साधी, जलदमी रात्रसेवा ३१७१/१५८८ २३८२/११९४
शिवशाही (आंतरराज्य) ४४२९/२२१७ ३१७५/१५९०
१२ मीटर ई बस (ई शिवाइ) ५००३/२५०४ ३६१९/ १८१२