Join us

ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 06:03 IST

सध्या नाजूक स्थितीमध्ये असलेल्या एसटीला उभारी देण्यासाठी हा उपक्रम मदत करणारा ठरेल, असे प्रताप सरनाईक म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळ आता आपल्या डेपोमध्ये असलेल्या पेट्रोलपंपाच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलची किरकोळ विक्री करणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या व्यावसायिक भागीदारीमधून उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण करण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

एसटी महामंडळाच्या २५१ डेपोमध्ये पेट्रोलपंप असून एसटीच्या बससाठी डिझेल विक्री होते. त्यामुळे पेट्रोलपंप चालवण्याचा आणि देखभाल करण्याचा अनुभव एसटी महामंडळाकडे आहे. तसेच हे सर्व पंप मोक्याच्या जागेवर असल्याने ऑइल विक्री करणाऱ्या कंपन्यांशी व्यावसायिक करार करून सर्वसामान्य ग्राहकांसाठी पेट्रोल आणि डिझेल विक्री करणारे पंप उभारणे प्रस्तावित असल्याचे सरनाईक म्हणाले. सध्या नाजूक स्थितीमध्ये असलेल्या एसटीला उभारी देण्यासाठी हा उपक्रम मदत करणारा ठरेल, असे सरनाईक म्हणाले.

डेपोतल्या जागांचा सर्व्हे

इंधन विक्रीसाठी एसटीच्या डेपोतल्या जागांचा सर्व्हे करण्यात आला असून त्याठिकाणी २५ बाय ३०  मीटर जागा निश्चित केल्या आहेत.  या ठिकाणी एसटी महामंडळाच्या केवळ इंधनाची विक्री होणार नसून रिटेल शॉप देखील उभारले जाणार आहेत. त्यामुळे येथे इतर व्यवसायालादेखील पूरक संधी उपलब्ध होईल, यातून एसटी महामंडळाला सार्वजनिक भागीदारीतून चांगला महसूल मिळण्यास मदत मिळणार आहे. 

भविष्यात व्यावसायिक इंधन विक्रीतून सर्वसामान्य ग्राहकाला विश्वासार्ह इंधन विक्री केंद्र एसटी महामंडळाच्या माध्यमातून उपलब्ध होईल, तसेच महामंडळाला  देखील उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण होईल. - प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री.

 

टॅग्स :एसटीराज्य सरकारप्रताप सरनाईकपेट्रोलडिझेल