लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळ आता आपल्या डेपोमधील पेट्रोलपंपावरून सर्वसामान्यांसाठीही पेट्रोल आणि डिझेलची विक्री करणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या व्यावसायिक भागीदारीतून महसुलाचा नवा स्रोत निर्माण करण्यासाठी हा उपक्रम सुरू केला जात आहे.
सध्या एसटी महामंडळाच्या २५१ डेपोंमध्ये पेट्रोलपंप असून तेथून फक्त एसटी बससाठी डिझेलचा पुरवठा केला जातो. परंतु आता हे पंप सर्वसामान्य ग्राहकांसाठी खुले करण्यात येणार असून, ऑइल कंपन्यांशी करार करून शुद्ध व दर्जेदार इंधनाची विक्री केली जाईल. या योजनेतून एसटी महामंडळाच्या उत्पन्नात मोठी भर पडेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
ग्राहकांना शुद्ध अन् दर्जेदार इंधन
एसटी महामंडळाकडे पेट्रोलपंप चालवण्याचा दीर्घ अनुभव असल्यामुळे ग्राहकांना शुद्ध, अचूक मापाचे व दर्जेदार इंधन मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
मोक्याच्या जागा, वाहनधारकांनाही पोहोचणे शक्य
एसटीचे डेपो प्रामुख्याने शहरांच्या मध्यवर्ती ठिकाणी किंवा मुख्य रस्त्यालगत आहेत. या मोक्याच्या जागेमुळे इंधन विक्रीत ग्राहकांना सहज पोहोच मिळेल आणि पंपाला चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.
विविध ठिकाणी जागांचा सव्र्व्हे, इतर सोईसुविधांचाही लाभ
एसटी महामंडळाने जिल्ह्यातील आगारांमध्ये इंधन विक्रीसाठी आवश्यक जागांचा सर्व्हे पूर्ण केला आहे. सरासरी २५ बाय ३० मीटर जागा यासाठी निश्चित करण्यात आली असून, तेथे इंधन पंपासोबत इतर सोयींची उभारणी होणार आहे.
पंपासोबत रिटेल शॉप्सही
इंधन विक्रीव्यतिरिक्त या ठिकाणी रिटेल शॉप्स देखील सुरू होणार आहेत.त्यामुळे प्रवासी व ग्राहकांना एका 3 ठिकाणी अनेक सुविधा मिळतील. यामुळे इतर व्यवसायांनाही चालना मिळेल.
प्रत्यक्षात कधी अंमलबजावणी?
सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर ऑइल कंपन्यांशी करार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील सहा महिन्यांत टप्प्याटप्प्याने राज्यातील निवडक आगारांमध्ये हे पंप सुरू होणार असून, उर्वरित आगारांमध्ये वर्षभरात सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.