Join us  

'मराठीचा पेपर फुटला नाही, विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2020 11:28 AM

तणावमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जावे.

मुंबई : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला मंगळवारी 3 तारखेपासून सुरुवात झाली आहे. मराठीचा पहिला पेपर असतांना कुऱ्हा ता. मुक्ताईनगर येथे अवघ्या 15 मिनिटातच मराठीची प्रश्नपत्रिका व्हाट्सअपवर फिरू लागल्याचे वृत्त होते. मात्र, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हे वृत्त फेटाळले आहे. तसेच, दहावीचा पेपर फुटला नसल्याचेही त्यांनी म्हटले.  

इयत्ता 10 दहावीचे परीक्षा केंद्र क्र. 3351, कुऱ्हा, काकोडा, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव येथे मराठी विषयाची प्रश्नपत्रिका फुटीबाबत वृत्त प्रसिध्द झाले आहे. याविषयी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असून नाशिक विभागीय शिक्षण मंडळाकडून सविस्तर अहवाल मागविण्यात आला. विभागीय सचिवांनी सखोल चौकशी करून अहवाल सादर केला आहे. त्यानुसार वरील परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारची प्रश्नपत्रिका फुटली नसल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिका फुटीचे वृत्त चुकीचे असल्याचे शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट म्हटले आहे. 

दहावीच्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तणावमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जावे. सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना परीक्षेनिमित्त हार्दिक शुभेच्छा असेही मंत्री श्रीमती गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून लिहिलेल्या परिपत्रकात आवर्जून नमूद केले आहे. दरम्यान, अशा पध्दतीच्या पेपरफुटीच्या बातम्या पसरविणाऱ्या माध्यमांनीही परीक्षार्थींच्या मानसिकतेवर परिणाम होईल, अशा बातम्या प्रसिद्ध करू नयेत असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

दरम्यान, दहावीच्या पहिल्याच पेपरला अवघ्या 15 मिनिटात पेपर फुटीचा धक्कादायक प्रकार व्हाट्सअपच्या माध्यमातून दिसून आला. अवघ्या 20 व्या मिनिटाला हे पेपर फुटीचे बिंग फुटले ते या गावातील काही झेरॉक्स सेंटरवरवर. या ठिकाणी उत्तरांची कॉपी झेरॉक्स करण्यासाठी आल्यामुळे कुऱ्हा येथे हा प्रकार घडल्याने पेपर फुटल्याचे वृत्त माध्यमांमध्ये झळकले होते. तसेच, सोशल मीडियावरही ती घटना व्हायरल होत होती.  

टॅग्स :मुंबईपरीक्षावर्षा गायकवाडदहावी