Join us

श्रीदेवींची हत्या झालीय, तो ठरवून केलेला खूनच; माजी एसीपीच्या दाव्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2018 09:40 IST

श्रीदेवींचा मृत्यू ज्या खोलीत झाला, त्या खोलीत जाण्यास पोलिसांनी नकार दिल्यानं वेद भूषण यांनी त्या खोलीच्या शेजारच्या खोलीत मुक्काम केला.

नवी दिल्लीः जगभरातील सिनेप्रेमींना 'सदमा' देऊन गेलेली बॉलिवूडची 'चांदनी', अर्थात ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूभोवतीचं गूढ आता आणखी वाढलं आहे. श्रीदेवींचा मृत्यू अपघाती किंवा आकस्मिक नव्हता, तर कट रचून त्यांचा खून करण्यात आलाय, असा खळबळजनक दावा दिल्लीतील एका माजी पोलीस अधिकाऱ्याने केला आहे. वेद भूषण असं त्यांचं नाव असून ते सध्या खासगी तपास संस्था चालवतात.

श्रीदेवींचा मृत्यू ज्या खोलीत झाला, त्या खोलीत जाण्यास पोलिसांनी नकार दिल्यानं वेद भूषण यांना त्याच्या शेजारच्या खोलीत मुक्काम केला होता. त्या रात्री श्रीदेवी यांच्या खोलीत काय घडलं असेल, कसं घडलं असेल, हा प्रसंग त्यांनी अगदी बारकाईने तपासून पाहिला. त्यावरून, या प्रकरणात काहीतरी गौडबंगाल असल्याचा त्यांना दाट संशय वाटतोय. याबाबतचं वृत्त 'फ्री प्रेस जर्नल'नं दिलं असून, श्रीदेवींच्या मृत्यूशी संबंधित अनेक प्रश्नांची समर्थनीय उत्तरंच मिळत नसल्याचं वेद भूषण यांनी नमूद केलंय.  

दुबईतील जुमेरा एमिरेट्स टॉवर्स या पंचतारांकित हॉटेलमध्ये 24 फेब्रुवारीच्या रात्री श्रीदेवी यांचा मृत्यू झाला होता. ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली होती आणि सगळेच हादरले होते. एका गुणी अभिनेत्रीचं अचानक काळाच्या पडद्याआड जाणं, हा सिनेप्रेमींसाठी मोठाच धक्का होता. या मृत्यूची बरीच उलटसुलट चर्चा झाली होती. काही जणांनी या मृत्यूबद्दल शंकाही उपस्थित केल्या होत्या. पण त्यावर हळूहळू पडदा पडला होता. अशातच, वेद भूषण यांनी पुन्हा या विषयाकडे लक्ष वेधलंय.   एखाद्या व्यक्तीचा श्वासोच्छवास थांबेपर्यंत त्याला बाथटबमध्ये बळजबरी बुडवून धरणं शक्य आहे. त्यात फारसा कुठलाच पुरावा मागे उरत नाही आणि हे सगळंच कसं अपघाती होतं, हे सहज भासवता येतं. तसंच काहीसं श्रीदेवींच्या बाबतीतही झालं आहे. हा ठरवून केलेला खून आहे, असं वेद भूषण यांचं म्हणणं आहे.  

टॅग्स :श्रीदेवीबॉलिवूडकरमणूक