रस्ते धुण्यासाठी १०० टँकरचे पाणी; मुंबईतील २४ विभागांमध्ये कॅनॉन यंत्रांद्वारे होणार फवारणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 12:18 IST2024-12-28T12:17:22+5:302024-12-28T12:18:23+5:30
रस्ते ब्रशिंग करून पाण्याने धुऊन काढण्यासाठी १०० टँकर तैनात केले आहेत.

रस्ते धुण्यासाठी १०० टँकरचे पाणी; मुंबईतील २४ विभागांमध्ये कॅनॉन यंत्रांद्वारे होणार फवारणी
मुंबई : इमारत, विविध विकास प्रकल्पांच्या बांधकामामुळे निर्माण होणारी धूळ आणि रस्त्यावरील धूळ रोखण्यासाठी २४ विभागांमध्ये मिस्ट कॅनॉन यंत्रांद्वारे फवारणी केली जात असून, रस्ते ब्रशिंग करून पाण्याने धुण्यासाठी १०० टँकरही तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेतर्फे देण्यात आली.
त्याचबरोबर प्रदूषणास कारणीभूत ठरत असलेल्या छोट्या-मोठ्या घटकांवरही अधिक लक्ष केंद्रित केले आहे. रस्त्यालगत सुरू असलेल्या बांधकामांमुळे निर्माण होणारी धूळ नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना हाती घेतल्याचे पालिकेने स्पष्ट केले.
वायू प्रदूषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी पालिकेतर्फे २४ प्रशासकीय विभागांमधील ट्रक माउंट फॉग मिस्ट कॅनॉन संयंत्रांद्वारे दोन सत्रांमध्ये नियमितपणे पाण्याची फवारणी केली जात आहे.
वर्दळीच्या रस्त्यांसह जेथे बांधकाम, पाडकाम, खोदकाम सुरू आहे, अशा ठिकाणी प्रकर्षाने पाण्याची फवारणी केली जात आहे. त्याकरिता वॉर्डातील दुय्यम अभियंता (पर्यावरण) विविध विभागांशी समन्वय साधून दररोज पाहणी करून वाहनांचे मार्ग निश्चित केले जात आहेत.
रस्ते ब्रशिंग करून पाण्याने धुऊन काढण्यासाठी १०० टँकर तैनात केले आहेत. त्यात पाच हजार लिटर क्षमतेचे ६७ आणि नऊ हजार लिटर क्षमतेचे ३९ टँकर आहेत, अशी माहिती देण्यात आली.
बेकायदा राडारोडा; वाहतुकीवर कारवाई
रस्ते, पदपथ स्वच्छतेसाठी ई-स्वीपर यंत्राचा अवलंब करण्यात येत आहे. खुल्या जागेत किंवा मोकळ्या जागेत बांधकामाच्या साहित्यावर नियमितपणे पाणी फवारणी होत असल्याची खातरजमा केली जात आहे.
बेकायदेशीर राडारोडा वाहतूक करणाऱ्या तसेच वाहनावर आच्छादन न टाकता सुरक्षेची कोणतीही उपाययोजना न करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात आहे.
बांधकामाच्या ठिकाणी धुळीचे कण निर्माण होण्यास कारणीभूत ठरणारा राडारोडा आणि अन्य घटकांवर सातत्याने आणि न चुकता पाण्याची फवारणी केली जात आहे.
स्प्रिंकलर्स तसेच फिरत्या अँटी स्मॉग गनचा वापर केला जात आहे, असेही सांगण्यात आले.