Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईसह राज्यातील तीन प्रकल्पांच्या भूसंपादन प्रक्रियेला वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 08:21 IST

विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका, विस्तारित समृद्धी महामार्ग आणि पुणे रिंग रोड या तीनही प्रकल्पांसाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेला २८ कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेसह जालना-नांदेड समृद्धी महामार्ग (विस्तारित मार्ग) आणि पुणे वर्तुळाकार रस्ता हे तीन महत्त्वाचे प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) राबविण्यात येत आहेत. या तीनही प्रकल्पांच्या भूसंपादन प्रक्रियेने वेग घेतला आहे. भूसंपादन पूर्ण करून नव्या वर्षात प्रकल्पांचे प्रत्यक्ष काम सुरू करण्याचा एमएसआरडीसीचा संकल्प आहे. 

विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका, विस्तारित समृद्धी महामार्ग आणि पुणे रिंग रोड या तीनही प्रकल्पांसाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेला २८ कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. आता ऑक्टोबरअखेरीस प्रत्यक्ष बांधकामासाठी आर्थिक निविदा मागविण्यात येणार आहेत. स्वारस्य निविदा सादर केलेल्या कंपन्यांमधूनच पात्र कंपनीला कंत्राट दिले जाणार आहे. तर डिसेंबरपर्यंत कंत्राट अंतिम करून नव्या वर्षाच्या सुरुवातीला या तिन्ही प्रकल्पांच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. विरार-अलिबागदरम्यान १२८ किमी लांबीची बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका बांधण्यात येणार आहे. तर मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचा विस्तार जालना-नांदेडपर्यंत करण्यात येणार आहे. पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी पुणे रिंग रोड बांधण्याचा निर्णय घेतला आहे. 

आपत्ती व्यवस्थापन कामांसाठी सल्लागार मिळेना

राज्यातील आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध कामांसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराच्या नेमणुकीसाठी पुन्हा निविदा काढली आहे. यापूर्वी काढलेल्या निविदेला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमला जाऊ शकला नव्हता.एमएसआरडीसीकडून राज्यातील आपत्ती व्यवस्थापनाची कामे केली जातात. त्यात बहुउद्देशीय निवारे, दरड कोसळू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच समुद्र किनाऱ्यावरील धूप प्रतिबंधक बंधारा बांधणे अशा कामांचा समावेश आहे.या कामांच्या संबंधात प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यासाठी ही निविदा पुन्हा काढण्यात आली आहे, असे एमएसआरडीसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

 

 

टॅग्स :मुंबईपुणे