Join us

मुंबई पुण्याच्या वेगवान प्रवासात गतीरोधक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2020 18:49 IST

Mumbai to Pune : घाटातील मिसिंग लिंकवरील प्रवासाची प्रतीक्षा वाढली   

मुंबई : मुंबईपुणे शहरा दरम्यानचा एक्स्प्रेस हायवेवरील प्रवास आणखी सुपरफास्ट करण्यासाठी बोर घाटात मिसिंग लिंकचे महत्वाकांक्षी काम सुरू आहे. परंतु, कोरोना संक्रमाण काळातील निर्बंधामुळे या कामांत अडथळे निर्माण झाल्याने काम पूर्णत्वाची मुदत किमान ६ महिने लांबणीवर पडली आहे. त्यामुळे ६ किमी अंतर आणि सुमारे २० मिनिटांचा कालावधी कमी करणा-या या प्रवासासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.  

मुंबई पुणे हा प्रवास करण्यासाठी एक्स्प्रेस हायवे (६ मार्गिका) आणि जुना मुंबई महामार्ग (४ मार्गिका) असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. परंतु, हे दोन्ही रस्ते खालापूर येथे एकत्र मिळतात आणि खोपोली एक्झिट येथे पुन्हा स्वतंत्र होतात. दोन महामार्गांच्या १० मार्गिकांमधून येणा-या वाहनांना या संयुक्त पट्ट्यातील चार मार्गिकांवरूनच मार्गक्रमण करावे लागते. हा भाग घाट माथ्यावरचा आहे. त्यामुळे इथे वाहनांचा वेग मंदावतो. पावसाळ्यात दरड कोसळून अपघात होतात. तसेच, अवजड वाहने बंद पडण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे घाटातील हा प्रवास अनेकदा त्रासदायक ठरतो. ही कोंडी फोडण्यासाठी खोपोली ते सिंहगड इन्स्टिट्यूट अशी मिसिंग लिंक विकसित करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. ८.९२ आणि १,७७ किमी लांबीचे दोन बोगदे आणि ७९० आणि ६५० मीटर्सचे दोन केबल ब्रिज इथे उभारले जात आहेत. एमएसआरडीसीच्या माध्यमातून राबविल्या जाणा-या या प्रकल्पासाठी नवयुग आणि अँफ्काँन या कंत्राटदारांची नियुक्ती झाली होती. प्रत्यक्ष सप्टेंबर, २०१८ मध्ये सुरू झाले असून निविदेतल्या अटीनुसार ते फेब्रुवारी, २०२२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु, ते आता लांबणीवर पडले आहे.

केबल ब्रिजच्या सुरक्षेमुळे विलंब

या प्रकल्पातील दोन केबल ब्रिज उभारणीचे काम अत्यंत महत्वाचे असून घाटातील वा-याचा वेग आणि अन्य सुरक्षेसाठी अन्य आघाड्यांवरील सर्वेक्षण करून काम मार्गी लावण्याचे नियोजन होते. त्यासाठी कोरीया येथील सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली होती. जुलै महिन्यात तो अभ्यास अपेक्षित होता. मात्र, कोरोना निर्बंधामुळे हा अभ्यासगट भारतात येऊ शकला नाही. त्यामुळे कामाला विलंब झाला. त्याशिवाय काही महिने कामगारांची संख्यासुध्दा कमी होती. त्याचाही परिणाम झाल्याची माहिती अधिका-यांकडून हाती आली आहे.     

टॅग्स :रस्ते सुरक्षारस्ते वाहतूकमुंबईपुणे