हरवलेल्या महिला-मुलींच्या शोधासाठी स्पेशल स्क्वॉड; शोधदर ९७% करणार; मुख्यमंत्री फडणवीस यांचे विधान परिषदेत आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 04:57 IST2026-03-05T04:56:55+5:302026-03-05T04:57:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : हरवलेल्या महिला आणि अल्पवयीन मुलींच्या शोधकार्यासाठी स्पेशल स्क्वाॅड आणि मोहिमा राबविण्यात येईल तसेच महिला-मुलींचा ...

हरवलेल्या महिला-मुलींच्या शोधासाठी स्पेशल स्क्वॉड; शोधदर ९७% करणार; मुख्यमंत्री फडणवीस यांचे विधान परिषदेत आश्वासन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : हरवलेल्या महिला आणि अल्पवयीन मुलींच्या शोधकार्यासाठी स्पेशल स्क्वाॅड आणि मोहिमा राबविण्यात येईल तसेच महिला-मुलींचा शोध घेण्याचे प्रमाण ९७ टक्क्यांपर्यंत नेण्याचे राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिले.
मुली बेपत्ता होण्याच्या घटना रोखण्यासाठी उपाय करण्याबाबतचा प्रश्न भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी उपेक्षित केला. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. आकडेवारीनुसार २०२५ या वर्षात ४८, २७८ महिला हरवल्या तर यातील ३६, ५८१ सापडल्या तर १२, ११३ अल्पवयीन मुली हरवल्या आणि त्यातील १०, २९५ सापडल्या.
कुठे किती कारवाई?
अशाप्रकारे मुंबई शहरात १ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२५ या एका महिन्यात ३०२ मुले-मुली हरवल्या, त्यातील २९७ शोधण्यात यश आले, नवी मुंबई भागात जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ मध्ये ५१९ मुले-मुली हरवले, ४९४ सापडले आणि नागपूर आयुक्तालयाच्या अंतर्गत जानेवारी २०२४ ते मे २०२५ या कालावधीत ५, ८८६ व्यक्ती हरवल्या आणि त्यातील ५,१६९ शोधण्यात आल्या. राज्यात नवजात बालक विक्री बाबत चंद्रपूर, मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड या पाच पोलिस विभागात ५ गुन्हे दाखल झाले आहेत.
हरवलेल्या मुले-मुलींच्या शोधासाठी नेमके काय?
हरवलेली मुले-मुलींच्या शोधासाठी निर्भया पथकासह ऑपरेशन मुस्कान, ऑपरेशन-शोध, अशा विविध मोहिमा राबविण्यात आल्या आहेत. त्याशिवाय महिला मदत कक्षाची स्थापना, २४ तास सुरू असलेली १०३, १०९१, ११२ या हेल्पलाईन, शाळांचे सेफ्टी ऑडिट असे उपाय राबविण्यात आले आहेत.
शिवाय एक स्पेशल सेल तयार करण्यात आले आहेत. त्या दर महिन्याला बैठक घेऊन प्रत्येक पोलिस स्टेशनला किती तक्रारी आल्या आणि त्याचा पाठपुरावा करतात. त्यामुळे वर्षभरात १० टक्क्यांनी व्यक्ती सापडल्याचा दर वाढला आहे. सध्या ८५-९० टक्के सापडण्याचे प्रमाण आहे, ते ९५-९५ टक्क्यापर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे, असे मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केले.