Operation Sindoor: देशबांधवांवर हल्ला करून अमानुषपणे हत्या करण्यात आली. त्याचा बदला म्हणून देशाचे पंतप्रधान आणि सैनिक यांनी जे काम केले आणि दहशतवाद्यांची ठिकाणे उद्ध्वस्त केली. त्याबद्दल एक कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून तसेच श्री सिद्धिविनायकाचे आशीर्वाद पंतप्रधान मोदी आणि भारतीय सैन्याला मिळावेत, यासाठी विशेष पूजा केली. आम्ही सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना करतो की, नरेंद्र मोदी यांच्यासारखे पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभोत, अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी दिली.
पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ निरपराध लोकांचा मृत्यू झाला होता. अनेक माताभगिनींचे कुंकू (सिंदूर) त्या दिवशी पुसले गेले. भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे अवघ्या पंचवीस मिनिटांत पाकिस्तानातील नऊ ठिकाणचे दहशतवादी तळ क्षेपणास्त्रांचा मारा करीत उद्ध्वस्त केले, तसेच त्यातील १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरात विशेष पूजा करण्यात आली. यानंतर सदा सरवणकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
शतपटीने उत्तर देण्याचे सामर्थ्य आहे
देशाचे पंतप्रधान सक्षम आहेत. ज्या पद्धतीने त्यांनी हल्ला केला, त्याला शतपटीने उत्तर देण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे. भारतीय सैन्यही सामर्थ्यवान आहे. हे सामर्थ्य आणखी वाढो, हीच प्रार्थना आम्ही सिद्धिविनायक चरणी करत आहोत. सिद्धिविनायक मंदिरात लाखो भाविक येतात. हे मंदिर दहशतवाद्यांच्या यादीत असते. त्यामुळे सिद्धिविनायकाचे सगळे ट्रस्टी, प्रशासन आणि पोलीस विभाग यांनी याबाबतीत योग्य काळजी घेतलेली आहे. काही सूचना आल्यास यापेक्षाही आवश्यक उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती सदा सरवणकर यांनी दिली.
दरम्यान, प्रशिक्षित निवृत्त माजी सैनिक यांची नियुक्ती करावी, अशी प्रकारचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व काळजी सिद्धिविनायक न्यास आणि प्रशासन यांच्याकडून घेतली जात आहे. यासाठी बैठका घेतल्या जात आहेत, असेही सरवणकर यांनी सांगितले.