Join us
Daily Top 2Weekly Top 5

राखी टपालासाठी खास वितरण व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2020 18:14 IST

कोरोना काळात भाऊ बहिणीला प्रत्यक्ष राखी बांधता आली नाही तरी राखी पोचवण्यासाठी टपाल विभाग सज्ज

रविवारी देखील टपाल कार्यालये सुरु राहणार

मुंबई :रक्षा बंधन  हा सण भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा भावनिक उत्सव आहे. दरवर्षी रक्षा बंधनासाठीच्या राखी टपाल हाताळण्यासाठी टपाल विभाग विशेष काळजी घेतो. यावर्षीदेखील राखी टपाल महाराष्ट्रातील टपाल कार्यालयाद्वारे मोठ्या प्रमाणात पाठवले जातील अशी अपेक्षा टपाल विभागातर्फे व्यक्त करण्यात आली आहे. यासाठी राखी टपाल बुकिंग, प्रक्रिया आणि वितरणाची विशेष व्यवस्था महाराष्ट्रातील सर्व डाक घरांतून करण्यात आली आहे. राखी टपालाच्या वेगवान प्रक्रियेसाठी राखी टपाल सेंटर मुंबई व नवी मुंबई येथेही सुरू करण्यात आले आहेत.

यावर्षी हा सण अधिक महत्वाचा आहे, कारण एकाच शहरात राहणाऱ्या भावंडांना विविध निर्बंधांमुळे या सणासाठी भेट घेणे शक्य होणार नाही. कदाचित त्यांचे भाऊ-बहिणी कंटेनमेंट झोन किंवा सीलबंद इमारतींमध्ये रहात असतील. या कोविड काळात, पोस्ट विभागाने राखी टपालाचे संकलन, प्रसार आणि वितरण यास सर्वात जास्त प्राधान्य दिले आहे आणि “स्पीडपोस्ट राखीच्या वितरणामुळे या कठीण काळात लोकांच्या जीवनात आनंद होईल” अशा घोषवाक्याने आनंद देण्याची विभागाची इच्छा आहे.

रक्षा बंधन सण  3 ऑगस्ट ला असल्यामुळे, महाराष्ट्र पोस्टल सर्कलने 2 ऑगस्ट, रविवारी सर्व वितरण पोस्ट कार्यालयांमध्ये राखी टपालाची विशेष वितरण व्यवस्था केली आहे. प्राधान्यक्रमाने व वेळेत राखी पोचण्यासाठी सर्वांनी लोक स्पीड पोस्ट सेवेचा फायदा घ्यावा,  असे आवाहन टपाल विभागामार्फत करण्यात आले आहे.

टॅग्स :रक्षाबंधनपोस्ट ऑफिस