"माझे शब्द मागे घेतो, पण..."; औरंगजेबाबद्दलच्या विधानावरुन अबू आझमींचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 15:30 IST2025-03-04T15:15:51+5:302025-03-04T15:30:03+5:30
औरंगजेबासंदर्भात केलेल्या विधानावरुन अबू आझमी यांनी माघार घेतली आहे.

"माझे शब्द मागे घेतो, पण..."; औरंगजेबाबद्दलच्या विधानावरुन अबू आझमींचे स्पष्टीकरण
SP Abu Azmi Row: समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भात केलेल्या विधानाने मोठा वाद निर्माण झाला आहे. अबू आझमी यांनी केलेल्या विधानाचे पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनातही उमटले. आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता असं म्हणत कौतुक केलं होतं. त्यामुळे दोन्ही सभागृहात अबू आझमी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अबू आझमी यांच्या निलंबनाची मागणी केली. त्यानंतर आता अबू आझमी यांनी आपलं विधान मागे घेत असल्याचे म्हटलं. माझं म्हणणं तसं नव्हतं, या विषयाला राजकीय वळण दिलं जात आहे, असं आझमी म्हणाले.
समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी औरंगजेबाबात धक्कादायक विधान केलं होतं. यावेळी त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचाही उल्लेख केला. अबू आझमी यांच्या वक्तव्यावरून सत्ताधाऱ्यांनी सभागृहात गोंधळ घातला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अबू आझमी यांना सभागृहात बसण्याचा अधिकार नसल्याचे म्हटलं. त्यानंतर वाढता वाद पाहता आझमी यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं आहे. एक्स पोस्टवरुन अबू आझमी यांनी याबाबत माहिती दिली.
"माझ्या विधानाची मोड-तोड करून ते दाखण्यात आलं. औरंगजेब यांच्याबद्दल मी तेच वक्तव्य केलं जे इतिहासकारांनी आपल्यासमोर मांडलं आहे. मी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज किंवा अन्य कुठल्याही महापुरुषाबद्दल कोणत्याही प्रकारचं अपमानजनक वक्तव्य केलं नाही. तरीदेखील माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माझे शब्द मागे घेतो. माझ्या वक्तव्याला राजकीय वळण दिलं जात आहे. माझ्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या विधीमंडळाचं अधिवेशन तहकूब होणं महाराष्ट्राच्या जनतेसाठी चांगली गोष्ट नाही. त्यामुळे जनतेचं नुकसान होतंय," असं आझमी यांनी म्हटलं.
"छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांचा वारंवार जाणीवपूर्वक अपमान अबू आझमी यांनी केलेला आहे. याचा निषेध करून धिक्कार करतो. औरंग्याचे गोडवे गाणे म्हणजे राष्ट्रपुरुषांचा अपमान आहे. जो अबू आझमी यांनी केला आहे. त्यामुळे त्यांना सभागृहात बसण्याचा अधिकार नाही," अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
अबू आझमींविरोधात गुन्हा दाखल
आझमींनी केलेल्या विधानानंतर त्यांच्या विरोधात ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण मुंबई पोलिसांकडे वर्ग करण्यात आलं. त्यामुळे आता मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.