South Mumbai was flooded this year due to metro and sea route projects | दक्षिण मुंबईची तुंबई का झाली?; दोन प्रमुख कारणं समोर आली

दक्षिण मुंबईची तुंबई का झाली?; दोन प्रमुख कारणं समोर आली

मुंबई : सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे गेल्या अनेक वर्षांमध्ये पहिल्यांदाच दक्षिण मुंबईतील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले. फोर्ट, चर्चगेट, मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी आदी परिसर पाण्याखाली गेले. याचे तीव्र पडसाद आता रहिवाशांमध्ये उमटत आहेत. मेट्रो रेल्वे आणि कोस्टल रोडसारख्या प्रकल्पांसाठी सुरू असलेले खोदकाम आणि समुद्रात भराव टाकला जात असल्याने पूर परिस्थिती निर्माण होत आहे, अशी नाराजी स्थानिक रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.

मुंबईतील पर्जन्यवाहिन्यांची क्षमता ताशी ५० मिलिमीटर पावसाचे पाणी वाहून नेऊ शकते. मात्र बुधवारी कुलाबा वेधशाळेत तीनशे मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या ४६ वर्षांत आॅगस्ट महिन्यातील हा सर्वाधिक पाऊस आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे या काळात दक्षिण मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी तुंबले. केम्स कॉर्नर, ब्रिच कँडी, चर्चगेट, मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी येथील अनेक सोसायट्यांच्या परिसरात पहिल्यांदाच पाणी तुंबले. अशी परिस्थिती अनेक वर्षांत पहिल्यांदाच अनुभवणारे रहिवासी यासाठी कोस्टल रोड आणि मेट्रो प्रकल्प जबाबदार असल्याचे मत व्यक्त करीत आहेत.
दक्षिण मुंबईत अशा प्रकारे पाणी तुंबलेले कधीच पाहिले नव्हते. गेल्या दहा-बारा वर्षांत या भागात काही प्रकल्पांसाठी भराव टाकण्याचे काम सुरू आहे. कोस्टल रोड, मेट्रो प्रकल्प अशी विकासकामे महत्त्वाची असली तरी त्यांचा आजूबाजूच्या परिसरावर कसा परिणाम होईल, याचा अभ्यास होणे आवश्यक आहे, असे मत केम्स कॉर्नर येथील रहिवासी उमा रंगनाथन यांनी व्यक्त केले. तर कोस्टल रोडच्या कामामुळे गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच चर्चगेट, ओव्हल मैदान या परिसरात पाणी तुंबल्याचे पाहिले, असे फोर्ट येथील रहिवासी हर्षित गाला यांनी सांगितले.

कोस्टल रोडमुळे पाणी तुंबत असल्याच्या तक्रारी येत असतील तर त्याचा अभ्यास निश्चितच करू. पण कोणताही वैज्ञानिक पुरावा नसताना अशा पद्धतीने कोस्टल रोड कामाला दोष देणे उचित नाही.
- इक्बाल सिंग चहल, महापालिका आयुक्त

मुंबईत एका दिवसात जास्त पाऊस पडण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र महापालिकेच्या पर्जन्य वाहिन्या अद्यापही ताशी ५० मि.मी. पावसाचे पाणी वाहून नेऊ शकतात. कोस्टल रोड प्रकल्पामुळे पाणी भरत आहे, असे बोलणे सध्या योग्य ठरणार नाही. मात्र भविष्यात अशी शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे पर्जन्य वाहिन्यांची क्षमता वाढविणे आवश्यक आहे.
- राहुल कद्र्री, नगर नियोजक

मेट्रोचे काम पूर्ण होत आले आहे, त्यामुळे तिथे काही सुधारणा होऊ शकत नाही. पण विकास करताना आधीच्या अडचणीत भर पडणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र सध्या अस्तित्वात असलेल्या उद्यानांची काळजी न घेता नवीन उद्यान तयार करण्यासाठी भराव टाकला जात आहे.
- झोरू बथेना, पर्यावरण कार्यकर्ते

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: South Mumbai was flooded this year due to metro and sea route projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.