ओल्या-सुक्या कचऱ्याचे घरीच वर्गीकरण करा; पालिकेचे नागरिकांना आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 10:16 AM2024-02-10T10:16:09+5:302024-02-10T10:18:01+5:30

रहिवासी संस्थांमध्ये राबविणार.

Sort wet dry waste at home municipality's appeal to citizens in mumbai | ओल्या-सुक्या कचऱ्याचे घरीच वर्गीकरण करा; पालिकेचे नागरिकांना आवाहन 

ओल्या-सुक्या कचऱ्याचे घरीच वर्गीकरण करा; पालिकेचे नागरिकांना आवाहन 

मुंबई : मुंबईत कचरा उत्पत्ती म्हणजेच कचरा निर्माण होणाऱ्या ठिकाणीच ओला-सुका कचरा वर्गीकरणात लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात येणार आहे. यासाठी पालिकेकडून स्थानिक पातळीवर रहिवासी संस्थांच्या परिसरात कचरा वर्गीकरणाबाबत माहिती, शिक्षण आणि संवाद तसेच जनजागृती करण्यात येणार आहे. 

 कचरा वर्गीकरणाचा विषय हाताळण्यासाठी आणि त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी मुंबईकरांमध्ये वर्गीकरणाविषयी जनजागृती व्हायला हवी. याच उद्देशाने पालिकेकडून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत नागरी अभियान २.० अंतर्गत कचरा निर्माण होणाऱ्या ठिकाणीच त्याचे वर्गीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत माहिती, शिक्षण आणि संवाद आराखडा निश्चित करणे अपेक्षित आहे. 

या पार्श्वभूमीवर मुंबईत रहिवासी संस्थांच्या माध्यमातून १ हजार टन इतका जमा होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण करणे, हे घनकचरा व्यवस्थापन विभागासमोरील मोठे आव्हान आहे. त्यामुळे कचऱ्याच्या उत्पत्तीस्थानाच्या ठिकाणीच वर्गीकरण करण्यासाठी लोकसहभाग वाढवण्याचा महानगरपालिकेचा मानस असल्याचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. शिंदे यांनी सांगितले. 

बायोगॅस निर्मिती :

महापालिका, महानगर गॅस लिमिटेड यांच्यामध्ये १ हजार टन क्षमतेच्या ओला कचऱ्यापासूनच्या बायोगॅसनिर्मिती प्रकल्पासाठी करार झाला आहे. त्या दिशेने ओला कचरा संकलित करण्यासाठीचा मार्ग आखण्यात आला असून विशेष वाहनांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, ओला कचरा संकलनामध्ये वर्गीकरणाचा मोठा अडथळा आहे. यावर जागृती म्हणून कचरा उत्पत्ती स्थानाच्या ठिकाणीच जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे.

मुंबईतील नागरिकांमध्ये विविध संदेशांच्या भित्तीचित्रांद्वारे आणि उड्डाण पूल, सार्वजनिक ठिकाणे इत्यादींवर सुशोभीकरणाद्वारे जागरूकता निर्माण करण्यात येणार आहे. त्यात चित्रे, भित्तीचित्रे आदी प्रकार समाविष्ट असतील. स्वच्छता, कचरा विलगीकरण आणि कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व या माध्यमातून पटवून देण्यात येणार आहे. 

कचरा वर्गीकरणासाठी लोकांच्या मानसिकतेत बदल घडवण्याची गरज आहे. यासाठीच रोजच्या कचरा संकलनाच्या प्रक्रियेत ओला आणि सुका कचरा वेगवेगळा टाकण्याचे महत्त्व लोकांना पटवून देणे गरजेचे आहे. मुंबईतील घरगुती तसेच रहिवासी संकुलातून कचऱ्याची मोठी निर्मिती होत असल्याने या लोकांपर्यंत याची माहिती पोहोचणे आवश्यक आहे.- संजोग कबरे, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन

Web Title: Sort wet dry waste at home municipality's appeal to citizens in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.