Sonai 'Honor Killing' case: murder by lower castes for not having relations with upper class girls - Court | सोनई ‘ऑनर किलिंग’ प्रकरण: निम्न जातीच्या लोकांनी उच्चवर्णीयांच्या मुलींशी संबंध न ठेवण्यासाठी ही हत्या - न्यायालय

सोनई ‘ऑनर किलिंग’ प्रकरण: निम्न जातीच्या लोकांनी उच्चवर्णीयांच्या मुलींशी संबंध न ठेवण्यासाठी ही हत्या - न्यायालय

मुंबई : उच्च जातीच्या मुलीशी निम्न जातीच्या मुलाने प्रेमसंबंध ठेवण्याचे प्रयत्न केले तर त्याला याच परिणामांना सामोरे जावे लागेल, हा संदेश तिघांची हत्या करून आरोपींना समाजाला द्यायचा होता. संपूर्ण पुरावे विचारात घेतले तर आरोपींचे पुनर्वसन होण्याची शक्यता नाही. ज्या पद्धतीने पीडितांची हत्या करण्यात आली, त्याचा परिणाम संपूर्ण समाजावर झाला आहे, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने पोपट उर्फ रघूनाथ दरंदले, प्रकाश दरंदले, रमेश दरंदले, गणेश दरंदले आणि संदीप कु-हे यांच्या फाशीच्या शिक्षेवर सोमवारी शिक्कामोर्तब
केले.

आरोपींच्या सूडभावनेमुळे तीन निर्दोष लोकांना जीव गमवावा लागला. पीडितांना जेव्हा दरंदले वस्तीवर टँक दुरुस्त करण्यासाठी बोलावले तेव्हा ते स्वत:चा बचाव करण्यासाठी असाहाय्य होते. आरोपींची हत्या करण्याचा कट पूर्वनियोजित होता, हे सिद्ध झाले आहे. सादर करण्यात आलेल्या पुराव्यांवरून आरोपींनी निर्घृणपणे हत्या केल्याचे स्पष्ट होते. सर्व पुरावे विचारात घेता या आरोपींचे पुनर्वसन होणे शक्य नाही, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने १३३ पानी निकालात नोंदविले आहे.

आरोपींच्या वकिलांनी आरोपींचे वय व त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे विचारात घेऊन फाशीची शिक्षा रद्द करून आजन्म कारावासाची शिक्षा ठोठाविण्याची विनंती न्यायालयाने केली. न्यायालयाने त्यांची ही विनंती अमान्य केली. ‘आरोपींच्या विरुद्ध व त्याच्या बाजूने असलेल्या सर्व परिस्थितींचा विचार केला आहे. गुन्ह्याच्या स्वरूपानुसार योग्य ती शिक्षा देणे, हे न्यायपूर्ण ठरेल. आरोपींचे वय, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसणे व पुनर्वसन होण्याची शक्यता, ही आरोपींच्या बाजूची परिस्थिती नाही.

गुन्हा केल्यानंतर आरोपींची जी वागणूक होती, त्यावरून त्यांना पश्चात्ताप झाला, असे आढळून येत नाही. त्यामुळे ही केस ‘दुर्मिळातील दुर्मीळ’ या श्रेणीतून वगळू शकत नाही. आरोपींच्या विरोधात असलेले पुरावे त्यांच्या बाजूने असलेल्या परिस्थितीपेक्षा अधिक महत्त्वाचे आहेत. त्यामुळे कनिष्ठ न्यायालयाने त्यांना ठोठाविलेल्या फाशीच्या शिक्षेत कपात करून त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा ठोठाविणे हे न्यायाला धरून नसेल,’ असेही न्यायालयाने म्हटले.

दुर्मिळातील दुर्मीळ प्रकरण
आरोपी कदाचित अट्टल गुन्हेगार नसतीलही, मात्र त्यांनी ज्या पद्धतीने सचिनची हत्या केली व क्रूरपणे सचिन आणि राहुलच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली, त्यावरून समाजाला मोठा धक्काच बसला आहे. हे प्रकरण ‘दुर्मिळातल्या दुर्मीळ’ प्रकारात मोडते. त्यामुळे आरोपींना फाशीच्या शिक्षेशिवाय अन्य कोणतीही शिक्षा ठोठावण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असे न्यायालयाने पाच जणांची फाशीची शिक्षा कायम करताना म्हटले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sonai 'Honor Killing' case: murder by lower castes for not having relations with upper class girls - Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.