कुछ बडा प्रॉब्लेम होने वाला है! विमानतळावर अनोळखी महिलेच्या कॉलमुळे खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 05:29 IST2024-12-17T05:29:31+5:302024-12-17T05:29:57+5:30
या महिलेने फोन करत विमानतळ कर्मचाऱ्यांना ‘कुछ बडा प्रॉब्लेम होने वाला है’ असे सांगत दहशतीचे वातावरण निर्माण केल्याचा तिच्यावर आरोप आहे.

कुछ बडा प्रॉब्लेम होने वाला है! विमानतळावर अनोळखी महिलेच्या कॉलमुळे खळबळ
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सहार पोलिसांनी रविवारी एका अनोळखी महिलेवर मुंबईविमानतळावर धमकीचा कॉल केल्याच्या आरोपाखाली आणि मुंबई-दिल्ली विमानामध्ये होणाऱ्या ‘विनाशकारी घटनेबाबत’ खोटी माहिती दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. या महिलेने फोन करत विमानतळ कर्मचाऱ्यांना ‘कुछ बडा प्रॉब्लेम होने वाला है’ असे सांगत दहशतीचे वातावरण निर्माण केल्याचा तिच्यावर आरोप आहे.
सहार पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरनुसार, रविवारी पहाटे विमानतळाच्या संपर्क केंद्राच्या हेल्पलाइनवर झोया म्हणून ओळख असलेल्या व्यक्तीकडून एक कॉल आला. तिने मुंबई-दिल्ली फ्लाइट ००४५ च्या सुरक्षेला धोका आहे, असे सांगत फ्लाइट तत्काळ थांबवावी, असा आग्रह धरला. महिलेने सांगितले की, ती प्रवाशांच्या सुरक्षेसाठी माहिती देत आहे. परंतु, अधिक तपशील न देता तिने फोन ठेवला. काही मिनिटांनंतर, महिलेने पुन्हा फोन करत फ्लाइट दिल्लीला रवाना झाली आहे का? असे विचारले. परंतु, तेव्हादेखील अधिक तपशील देणे टाळले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा बैठक घेऊन विमानाची कसून तपासणी करण्यात आली. मात्र, सुरक्षा कर्मचाऱ्यांना काहीही संशयास्पद आढळले नाही. तथापि, योग्य तपासणीनंतर सुरक्षा अधिकाऱ्यांनी ही माहिती फसवी असल्याचे घोषित केले.
तसेच हा कॉल ‘नॉन-स्पेसिफिक’ म्हणून घोषित करण्यात आला आणि विमानाने दिल्लीसाठी उड्डाण केले. या कॉलमुळे फ्लाईट उडायला विलंब झाला.
विमानतळाच्या जॉइंट कंट्रोल सेंटरच्या सहायक व्यवस्थापिका प्रीती माजवेलकर यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक शांतता भंग करण्याच्या उद्देशाने खोटी माहिती दिल्याबद्दल आम्ही बीएनएस कायद्याचे कलम १२५, ३५२(४) आणि ३५३(१)(ब) अन्वये अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तिने धमकी देण्यासाठी वापरलेला मोबाईल नंबर ट्रेस करून महिलेचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यानुसार तिला लवकरच अटक केली जाईल, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.