Join us  

#SocialForGood : इम्तियाज अली, रजनीकांतची मुलगी करणार मानसिक आरोग्याबाबत जागृती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 1:12 PM

#SocialForGood : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रानंही सामाजिक कार्याचं व्रत स्वीकारलं आहे. 'सोशल फॉर गुड' (#SocialForGood) या मोहीमे अंतर्गत विविध सामाजिक मुद्यांबाबत जनजागृती करण्याची जबाबदारी तिनं घेतली आहे.

मुंबई - आपण समाजाचं काही तरी देणं लागतो. समाजातील प्रत्येक घटकासाठी कधी तरी काही तरी करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परिनं झटत असतो. सामाजिक कार्यकर्त्यांसोबत आता सेलिब्रिटी मंडळीही समाजाचा एक भाग म्हणून विविध मोहिमांद्वारे समाजोपयोगी कार्य प्रभावीपणे राबवताना दिसतात.  

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रानंही सामाजिक कार्याचं व्रत स्वीकारलं आहे. 'सोशल फॉर गुड' (#SocialForGood) या मोहीमे अंतर्गत विविध सामाजिक मुद्यांबाबत जनजागृती करण्याची जबाबदारी तिनं घेतली आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वाधिक वापरली जाणारी सोशल मीडिया साईट फेसबुकसोबतप्रियांका चोप्रा ही सामाजिक मोहीम राबवणार आहे. 27 नोव्हेंबर रोजी चार तास चालणाऱ्या या लाईव्ह उपक्रमामध्ये मानसिक आरोग्य, सायबर गुन्हे आणि महिला सक्षमीकरण यांसारख्या मुद्यांवर जनजागृती करण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये प्रियांका चोप्रा व्यतिरिक्त मोठ-मोठी दिग्गज मंडळीही सहभागी होणार आहेत.  

(#SocialForGood : 'सोशल फॉर गुड'साठी प्रियांका चोप्रा आणि फेसबुक इंडिया एकत्र!)

27 नोव्हेंबरला दुपारी 12 वाजता 'मानसिक आरोग्य' या विषयावर चर्चा होणार आहे. यामध्ये बॉलिवूडचे दिग्दर्शक इम्तियाज अली, सौंदर्या रजनिकांत आणि सोनाक्ष अय्यंगार यांचा पॅनलमध्ये समावेश आहे. हा कार्यक्रम लोकमतच्या फेसबुक पेजवरही लाईव्ह पाहता येणार आहे. 

 

या उपक्रमासंदर्भात प्रियांकाने सांगितले की, 'सोशल मीडिया हे फार मोठे व्यासपीठ आहे. यापासून कोणीही दूर राहू शकत नाही. याचा वापर चांगल्या कामांसाठी करून घेणं गरजेचं आहे. जनजागृतीसाठी, वास्तविक जीवनातील प्रेरित करणाऱ्या कथा लोकांसमोर मांडण्यासाठी, नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी या माध्यमांचा वापर केला गेला पाहिजे. सोशल मीडियाचा अनेकदा चांगल्या कामांसाठी झालेला सकारात्मक परिणाम वैयक्तिकरित्या अनुभवला आहे.'

प्रियांकाने 'सोशल फॉर गुड' या उपक्रमाबाबत सांगितले की, 'मी फेसबुकसोबतच्या या पार्टनरशिपबाबत फार खूश आहे. मला असा विश्वास आहे की, यामार्फत जनजागृती करण्यास मदत होईल.'  या उपक्रमाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळेल आणि लोकांमध्ये जनजागृती होण्यासही मदत होईल, असा विश्वास प्रियांका चोप्रा आणि फेसबुक इंडियानं व्यक्त केला आहे.

टॅग्स :प्रियांका चोप्रासमाजसेवकफेसबुकइम्तियाज जलील