मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर सुधीर आणि त्याच्या पत्नी यांना ब्रेनडेड घोषित केले असून, चार किडनी उपलब्ध आहेत. या आशयाचा मेसेज प्रसारित केला जात आहे. अनेकांच्या मोबाइलवर तो मेसेज आलेलासुद्धा असेल, काही जण त्याची दाखल घेतात तर वाचून सोडून देतात. विशेष म्हणजे, त्यामध्ये सुधीर यांच्या कुटुंबीयांना त्या किडनी दान करावयाच्या आहेत. कृपया प्रसारित करा, असे सांगितलेले असते. मात्र, किडनी विकारतज्ज्ञांनी अशा पद्धतीने कोणतीही किडनी उपलब्ध नसते. त्यामुळे या फेक मेसेजपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून हा मेसेज सर्व ठिकणी व्हायरल झाला आहे. अनेक जण सोशल मीडियावरील हा संदेश कुणाच्या तरी फायद्याचा ठरावा म्हणून अनेक ओळखीच्या लोकांना आणि ग्रुप्समध्ये पाठवत आहे. मात्र,त्याची सत्यता तपासण्याची तसदी कुणीही घेत नाही. तसेच त्या मेसेजमध्ये दोन मोबाइल क्रमांक सुद्धा देण्यात आले आहेत. मात्र, ते दोनही क्रमांक बंद आहेत. बॉम्बे हॉस्पिटलचे किडनीविकार तज्ज्ञ डॉ. श्रीरंग बिच्चू यांनी सांगितले की, अनेक महिन्यांपूर्वी हा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वैद्यकीयदृष्ट्या अशा पद्धतीने किडनी उपलब्ध नसतात. नागरिकांनी या मेसेजवर विश्वास ठेवू नये. याशिवाय तुम्हाला हा मेसेज आल्यास कोणालाही फॉरवर्ड करू नका. गेल्या काही वर्षांत मलाही अशा स्वरूपाचा मेसेज अनेकदा आला आहे.