Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाळांमध्ये सोशल डिस्टंसिंग अशक्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 17:35 IST

कोरोना संक्रमण काळात शाळा नकोच; ७६ टक्के पालकांचा स्पष्ट विरोध

 

मुंबई : लाँकडाऊनचे निर्बंध शिथिल करताना तूर्त शाळा सुरू झाल्या नसल्या तरी पुढील टप्प्यात त्याबाबतचा निर्णय घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. परंतु, कोरोनाचे संक्रमण सुरू असताना शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून सोशल डिस्टंसिंग पालन होणे अशक्य आहे. त्यामुळे जोपर्यंत हे संक्रमण थांबत नाही तोपर्यंत शाळा सुरू करणे हितावह नसल्याचे मत तब्बल ७६ टक्के पालकांनी नोंदविले आहे.

सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करून शाळा सुरू करता येतील का या मुद्यावर लोकल सर्कल या संस्थेने नुकतेच एक सर्वेक्षण केले. त्यात ३८ टक्के पालकांनी या नियमांचे पालन केवळ अशक्य असल्याचे मत नोंदविले आहे. तर, ३८ टक्के पालकांना हे निकष पाळणे विद्यार्थ्यांना अवघड जाईल असे मत व्यक्त केले आहे. विद्यार्थ्यांना ते थोडं अवघड जाईल असे ११ टक्के पालकांचे म्हणणे आहे. तर, १० टक्के पालकांना विद्यार्थी ती कला अवगत करतील असे वाटते. फक्त २ टक्के पालकांनी विद्यार्थी हे निकष पाळू शकतात असे मत या सर्वेक्षणात व्यक्त केले आहे. देशातील २२४ जिल्ह्यांतील १८ हजार पालकांची मते आजमावल्यानंतर हा अहवाल तयार करण्यात आला आहे. तसेच, या अहवालाच्या प्रति मनुष्यबळ विकास मंत्री, शिक्षण विभागाचे सचिव, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री यांना सादर करणार आहेत. त्या अहवालाच्या आधारे सरकारने पुढील निर्णय घ्यावे अशी विनंतीही त्यांना केली जाणार असल्याचे लोकल सर्कलच्यावतीने सांगण्यात आले आहे.  

 

 

शाळा कधी सुरू कराव्या ?

२० किलोमीटरच्या परीघात एकही कोरोना रुग्ण आढळला नाही तर त्यानंतर २१ दिवसांनी शाळा सुरू कराव्या एसे ३७ टक्के पालकांना वाटते. तर, राज्यातील आणि देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे थांबल्यानंतरच शाळा सुरू कराव्यात असे अनुक्रमे १६ आणि २० टक्के पालकांचे मत आहे. तर, जेव्हा कोरोनावर मात करणारी लस उपलब्ध होईल तेव्हाच शाळा सुरू कराव्या असे १३ टक्के पालकांना वाटते. तर, शाळा नियमित वेळापत्रकानुसारच सुरू कराव्या असे सांगणा-या पालकांची संख्या ११ टक्के आहे.

 

परदेशातील अनुभाव वाईट

फ्रान्समध्ये शाळा सुरू केल्यानंतर तिथे पहिल्या आठवड्यातच ७० नवे रुग्ण आढळले होते. डेन्मार्क आणि क्रोएशिया या देशांनीसुध्दा नुकतेच शाळा सुरू करण्याचे आदेश जारी केले असून त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतोय. इस्त्रायलने शाळा सुरू केल्यानंतर पहिल्या काही दिवसांतच   २२० शिक्षक आणि विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली होती. तर, तब्बल १० हजार जणांना क्वारंटाईन करावे लागले होते. तसेच शाळेत एक जरी कोरोनाचा रुग्ण आढळला तर शाळा बंद करण्याचे आदेश या सरकारने दिले आहेत.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याशिक्षण क्षेत्रमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस