पौडवाल कुटुंबातील लहान पिढीची सामाजिक बांधिलकी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:06 IST2021-05-09T04:06:33+5:302021-05-09T04:06:33+5:30

राज चिंचणकर लोकमत न्यूज नेटवर्क कोरोना प्रादुर्भावाच्या काळात, या व्याधीने बाधित झालेल्यांना अनेक जण आपापल्या परीने मदत करण्यात खारीचा ...

The social commitment of the younger generation in the Paudwal family! | पौडवाल कुटुंबातील लहान पिढीची सामाजिक बांधिलकी!

पौडवाल कुटुंबातील लहान पिढीची सामाजिक बांधिलकी!

राज चिंचणकर

लोकमत न्यूज नेटवर्क

कोरोना प्रादुर्भावाच्या काळात, या व्याधीने बाधित झालेल्यांना अनेक जण आपापल्या परीने मदत करण्यात खारीचा वाटा उचलत आहेत. मोठी माणसे यात आघाडीवर असतानाच, काही लहान मुलांनी त्यांना मिळणाऱ्या पॉकेटमनीचा उपयोग अशा कार्यासाठी केल्याचे उदाहरण आता समोर आले आहे. ज्येष्ठ पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल व दिवंगत संगीतकार अरुण पौडवाल यांच्या परिवारातील सर्वात लहान पिढीच्या सदस्यांनी ही सामाजिक बांधिलकी जपली आहे.

अनुराधा पौडवाल यांच्या कुटुंबात बरेच लहान सदस्य आहेत आणि याच छोट्या मुलांनी स्वतःच्या पॉकेटमनीचे पैसे एकत्र करून, त्यातून जे. जे. रुग्णालयाला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिला आहे. आम्ही आमच्या पाकिटातून काही दान करू शकतो, मग तुम्ही का नाही, असा संदेशही या मुलांनी यासाठी खास तयार केलेल्या चित्रकोलाजातून दिला आहे.

अरुण पौडवाल यांच्या ९ मे रोजी असलेल्या जयंती दिनाचे औचित्य साधून पौडवाल कुटुंबीयांच्या सूर्योदय फाउंडेशनतर्फे त्याचे वितरण केले जाणार आहे. अनुराधा पौडवाल यांच्या निवासस्थानी, जे.जे. रुग्णालयाचे पदाधिकारी त्याचा स्वीकार करणार आहेत. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीही कोरोना प्रादुर्भावाच्या काळात पौडवाल कुटुंबीयांनी जे.जे. रुग्णालयाकडे पीपीई किट आणि तत्सम सामग्री सुपुर्द केली होती. मोठ्यांच्या पावलावर पाऊल टाकत, पौडवाल कुटुंबातील छोट्या मंडळींनी आता त्यांचे अनुकरण करत, सामाजिक बांधिलकीचा वसा घेतल्याचे स्पष्ट होत आहे.

अभिमानाची गोष्ट...

आमच्या परिवारातील छोट्या मुलांनी आपणहून त्यांच्या पॉकेटमनीचा विनियोग समाजासाठी अशा पद्धतीने करावा, ही आम्हा संपूर्ण पौडवाल कुटुंबीयांसाठी खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे.

- अनुराधा पौडवाल (ज्येष्ठ पार्श्वगायिका)

--------------------------------------------------------------------------------------------------------------

Web Title: The social commitment of the younger generation in the Paudwal family!