Join us  

सरकारचा जेट्टी व रोरो सेवेच्या आड पूल बांधण्याचा डाव हाणून पाडणार - उल्का महाजन यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 7:27 PM

रोरो सेवेच्या नावाखाली बांधण्यात येत असलेली जेट्टी निव्वळ दिखावा असून भूमिपूत्रांचा विरोध डावलून गोराई व मनोरी खाडीवर पुल बांधण्याचाच हा कुटिल डाव आहे अशी टीका सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी केली.

मीरारोड - रोरो सेवेच्या नावाखाली बांधण्यात येत असलेली जेट्टी निव्वळ दिखावा असून भूमिपूत्रांचा विरोध डावलून गोराई व मनोरी खाडीवर पुल बांधण्याचाच हा कुटिल डाव आहे. हा पूल झाला तर गाव आणि भूमिपुत्रांचे अस्तित्वच उध्वस्त होणार आहे . स्थानिकांना रोजी-रोटीस मुकावे लागेल. वाहनांची वर्दळ वाढून प्रदूषणासह गुन्हेगारी वाढेल.  स्थानिकांचा विकास होण्याऐवजी जीवन भकास होईल.म्हणून सरकारचा रोरो व जेट्टीच्या आड चाललेला कुटील डाव एकजुटीने हाणून पाडणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी मनोरी चर्च मैदानातील जाहीर सभेत दिला.

बुधवारी रात्री मुंबईतल्या मनोरी चर्च मैदानात धारावी बेट बचाओ समिती तर्फे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी फादर एडवर्ड जसींटो, फादर अजीत, अ‍ॅड.गॉडफ्री पेमेंटा, वॉचडॉग फाऊंडेशनचे अध्यक्ष निकलस अल्मेडा, पिटर गुडीनो, रॉमी, लुड्स डिसोझा, संदीप बुरकेन आदी उपस्थित होते. गोराई - मनोरी सह भाईंदरच्या उत्तन, पाली, चौक, डोंगरी, तारोडी आदी गावांतील ग्रामस्थ सभेस जमले होते. 

मासेमारी, शेती हा स्थानिकांच्या उपजीविकेचं प्रमुख साधन आहे. या शिवाय टांगा, बैलगाडी, रिक्षा, हॉटेल, टपरी असे छोटे-छोटे जोडधंदे आहेत. या उपजीविकेच्या साधनांमुळे पर्यावरणास धोका पोहोचत नाही. रस्ता रुंदीकरणामुळे दूतर्फा असलेली घरे पाडली जातील. बहुतांशी लोकांकडे सातबारा नसल्यामुळे घरेही मिळणार नाहीत अशी भीती महाजन यांनी व्यक्त केली . 

सागरमाला प्रकल्प अंतर्गत गोराई-मनोरी येथे जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ उभारण्याची सरकारची योजना आहे. त्यामुळे इथं असलेला समुद्र आणि तलावात ही नौकानयन सारखे प्रकल्प राबविले जातील . सरकार म्हणतंच की आम्ही गोराई-मनोरीचा विकास करतोय. परंतु हा विकास इथल्या भूमिपुत्रांचा नसून धनदांडग्यांचा व बड्या कंपन्यांचा विकास होणार असल्याचा आरोप महाजन यांनी केला.  

हा देश अंबानी, अदानी, मित्तल, जिंदाल यांच्या मालकीचा नसून तो शेतकरी, मच्छीमारांच्या मालकीचा आहे हे सरकारने ध्यानात ठेवावे. सरकार देश धनदांडग्यांच्या घशात घालत आहे. धारावी बेट वाचविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने लढा देण्यासाठी सज्ज व्हायचं आहे. आता जेट्टी - रोरो सेवासुद्धा बंद पाडायला भाग पाडू. गावातील प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवा, आपल्यातूनच काही दलाल निर्माण होतील त्यांचा शोध घ्या, आपापसात फूट पाडू देऊ नका असही आवाहन उल्का महाजन यांनी केले . 

टॅग्स :सरकारसमाजसेवकमीरा-भाईंदर