Join us  

"धनंजय मुंडे काय पराक्रमी योद्धा आहेत का?; सत्कार करणाऱ्यांची मानसिकता तपासायला हवी"

By मुकेश चव्हाण | Published: February 03, 2021 10:08 PM

धनंजय मुंडे यांचे मोठे सत्कार आणि जल्लोषात स्वागत करताना काही लोक दिसत आहेत.

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचं विविध ठिकाणी जंगी स्वागत होत आहे. धनंजय मुंडे मंगळवारी औरंगाबादमध्ये दाखल झाले होते. त्यावेळी देखील त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. त्यांच्या स्वागतासाठी इथं मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली होती. शिवाय मुंडेंप्रती कार्यकर्ते आणि समर्थकांचं प्रेम इथं एका वेगळ्याच अंदाजात पाहायला मिळालं. मात्र याचपार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी निशाणा साधला आहे. 

धनंजय मुंडे यांचे मोठे सत्कार आणि जल्लोषात स्वागत करताना काही लोक दिसत आहेत. धनंजय मुंडे हे पराक्रमी योद्धा असल्याप्रमाणे त्यांचे स्वागत केले जात आहे. परंतु त्यांनी विवाहबाह्य संबंध ठेवून त्यातून त्यांना दोन मुले आहेत याची कबुली त्यांनी स्वतःच दिलेली होती, असं तृप्ती देसाई यांनी सांगितलं. तसेच धनंजय मुंडे यांचे जल्लोषात स्वागत करणारे आणि मोठमोठे सत्कार करणाऱ्यांची मानसिकता आपल्याला तपासावी लागेल, अशी टीकाही तृप्ती देसाई यांनी केली आहे. त्याचप्रमाणे हे असेच सुरु राहिले तर काही काळानंतर बलात्काराचे आरोप असलेल्या नेता आणि मंत्र्यांचे स्वागत करण्याचा चुकीचा पायंडा पडेल, अशी भीती देखील तृप्ती देसाई यांनी व्यक्त केली आहे.

धनंजय मुंडेंनी माझ्या मुलांना डांबून ठेवलंय, त्यांना काही झाल्यास...; करुणा मुंडेंचा खळबळजनक आरोप

तत्पूर्वी, धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या तरुणीने तक्रार मागे घेतली असली, तरी मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ निर्माण होण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा मुंडे (शर्मा) यांनी बुधवारी मुंबई पोलीस आयुक्तांकड़े मुंडेविरोधात तक्रार केली आहे. या तक्रारीत गेल्या तीन महिन्यापासून मुंडे यांनी त्यांच्या दोन मुलांना चित्रकूट येथील त्यांच्या बंगल्यात डांबून ठेवल्याचा आरोप करुणा मुंडे यांनी केला. 

धनंजय मुंडेंनी आरोपवर दिलं स्पष्टीकरण-

करुणा मुंडे यांच्या आरोपानंतर आता धनंजय मुंडे यांनी देखील स्पष्टीकरण दिलं आहे. धनंजय मुंडे या आरोपाबाबत म्हणाले की, करुणा शर्मा यांचे बाबतीत मी पुर्वीच खुलासा केला आहे. त्यांच्यासोबत असलेल्या विवादात मी स्वतःहून उच्य न्यायालयात याचिका दाखल केली असुन त्याबाबतीत सदर खुलाशात सविस्तर नमुद केले आहे. सदर याचिकेत  उच्य न्यायालयाने करुणा शर्मा यांना मनाई आदेशही दिला आहे. त्यानंतर विवादावर तोडगा काढण्यासाठी दोघांनी सहमतीने मेडिएटर नेमण्याची विनंती केल्यावरून उच्य न्यायालयाने, मद्रास उच्च न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायाधीश ताहिलरामानी यांची मेडिएटर म्हणुन नियुक्तीसुद्धा केली आहे, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली. 

'माझी निव्वळ बदनामी...'; दुसऱ्या पत्नीच्या आरोपानंतर धनंजय मुंडेंनी दिलं स्पष्टीकरण

करुणा मुंडेंनी नेमके काय आरोप केले आहे-

करुणा मुंडे यांनी पोलीस आयुक्ताकडे दिलेल्या अर्जामध्ये माझे पती धनंजय मुंडे यांनी गेल्या तीन महिन्यापासून दोन मुलांना त्यांच्या चित्रकूट बंगल्यात लपून ठेवले आहेत. मला त्यांच्याशी भेटू देत नाही. २४ जानेवारी रोजी मुलांची भेट घेण्यासाठी बंगल्यावर जाताच, मुंडे यांनी ३० ते ४० पोलिसांना बोलावून मला हकलून लावले.  चित्रकूट बंगल्यावर माझी मुले सुरक्षित नाही. त्यात १४ वर्षाच्या मुलीचाही समावेश असून महिला केअरटेकरही नाही, असं नमूद करण्यात आलं आहे. तसेच मुंडे त्यांच्यासमोर अश्लील वर्तन करतात.

माझ्या मुलांसोबत काही चुकीचे झाल्यास त्याला मुंडे जबाबदार असणार आहेत. जर माझ्या मुलांसोबत माझी भेट घालून दिली नाही तर २० फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाला बसणार आहे. त्यामुळे  चित्रकूट बंगल्यासमोर किंवा मंत्रालय आणि आझाद मैदान येथे उपोषणासाठी परवानगी दया. आणि मुंडे यांच्यावर कठोर करावाई करा अशी विनंतीही करुणा मुंडे यांनी केली आहे. 

आज मेरा जन्मदिन हे पर मेरे पती ने 3 महीने से मेरे बच्चे छुपा के उसके बंगले चित्रकूटपे रखे हे मुझे मिलने ओर बात करने भी नहि दे रहा हे राजनीति की पावर का दूर उपयोग इतना अत्याचार तो रावण ने भी नहि किया होगा

Posted by Karuna Dhananjay Munde on Monday, 1 February 2021
टॅग्स :धनंजय मुंडेराष्ट्रवादी काँग्रेसमहाराष्ट्र