Uddhav Thackary-Raj Thackary Alliance: राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या यशानंतर आता आगामी महापालिका निवडणुकांसाठी राजकीय वातावरण पूर्णपणे तापले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी आगामी महापालिका निवडणुकांसाठी अधिकृतपणे युतीची घोषणा केली आहे. आज मुंबईत आयोजित एका संयुक्त पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येत या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा केली. या युतीमुळे राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
'पक्षातली मुलं पळवणारी टोळी सक्रिय'; राज ठाकरेंचा घणाघात
या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत सत्ताधारी भाजप आणि शिंदे सेनेवर जोरदार टीका केली. मात्र यावेळी दोन्ही नेत्यांनी जागा वाटपाची कोणतीही माहिती दिली नाही. राज्यात सुरू असलेल्या पक्षांतराच्या राजकारणावर भाष्य करताना त्यांनी सध्या राज्यात राजकीय पक्षातील मुले पळवणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत असं म्हटलं. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीचा संदर्भ देत त्यांनी नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर निशाणा साधला.
"जे काही बाकी बोलायचं आहे ते जाहीर सभांमधून बोलणार आहे. माझ्या एका मुलाखतीमध्ये मी म्हटलं होतं की कुठल्याही वादापेक्षा किंवा भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आम्ही एकत्र येण्याची सुरुवात त्या वाक्यापासून झाली. किती जागा लढवणार, आकडा काय हे तुम्हाला सांगणार नाही. महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुलं पळणाऱ्या खूप टोळ्या फिरत आहेत. त्याच्यामध्ये दोन टोळ्या अजून अॅड झाल्या आहेत ज्या राजकीय पक्षांमधील मुलं पळवत आहेत. जे निवडणुका लढवणार आहेत त्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडून उमेदवारी दिली जाईल. आज मनसे आणि शिवसेनेची युती झाल्याचे जाहीर करत आहोत," असं राज ठाकरे म्हणाले.
जागावाटपाचा सस्पेन्स कायम
युतीची घोषणा झाली असली तरी, कोणत्या पालिकेत कोणता पक्ष किती जागा लढवणार, याबाबतचा तपशील अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे. जागावाटपाबाबत दोन्ही पक्षांकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.
राज्यातील या नव्या राजकीय समीकरणामुळे आता महायुती विरुद्ध ठाकरे-मनसे युती असा सामना पाहायला मिळणार आहे. ही युती महापालिका निवडणुकीत किती प्रभावी ठरते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
Web Summary : Uddhav Thackeray and Raj Thackeray announced an alliance for upcoming municipal elections. Details on seat sharing were not disclosed, keeping the suspense alive. Raj Thackeray criticized the current political climate, hinting at poaching of leaders, and promised joint candidate selection.
Web Summary : उद्धव ठाकरे और राज ठाकरे ने आगामी नगर पालिका चुनावों के लिए गठबंधन की घोषणा की। सीटों के बंटवारे का विवरण अभी तक नहीं बताया गया है, जिससे रहस्य बरकरार है। राज ठाकरे ने मौजूदा राजनीतिक माहौल की आलोचना की और संयुक्त उम्मीदवार चयन का वादा किया।