... so Sushant's tongue should not have come out! | ...म्हणून सुशांतची जीभ बाहेर आली नसावी!

...म्हणून सुशांतची जीभ बाहेर आली नसावी!

गौरी टेंबकर-कलगुटकर 
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत (३४) याच्या मृत्यूनंतर त्याच्या बेडरूममधील मृतदेहाचे फोटो व्हायरल झाले होते. त्याने आत्महत्या केल्याचेच अद्यापच्या तपासातून उघड झाले आहे. त्याचा अंतिम शवविच्छेदन आणि व्हिसेरा अहवालही समोर आला असून यातही काही संशयास्पद आढळलेले नाही. तरी त्याच्या मानेवरील जखम आणि त्याचा आकार, बाहेर न आलेली जीभ व डोळ्यांच्या अर्धवट बंद असण्यावरून त्याच्या चाहत्यांना ही हत्याच असल्याचा संशय आहे. याबाबत तज्ज्ञ आणि नायर रुग्णालयाच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. शैलेश मोहिते यांच्याकडे ‘लोकमत’ने विचारणा केली असता त्यांनी अनेक पैलू उलगडून सांगितले.
गळफास घेतल्यावर मानेवर ‘व्ही’ आकार येणे किंवा न येणे हे गळफास घेणाऱ्या व्यक्तीचा मृतदेह हा पूर्णपणे लटकलेल्या स्थितीत होता की अर्धवट (ढोपरांवर दुमडलेल्या) यावर अवलंबून असते. व्यक्ती पूर्णपणे टांगला गेला असेल तर मानेवर व्ही आकार तयार होतो आणि अर्धवट असल्यास थोडाफार आडवा अथवा यू आकार मानेवर तयार होतो. व्यक्तीचे वजन जास्त असेल आणि तो बराच वेळ टांगलेल्या अवस्थेत असेल तर ती जखम खोलवर असते आणि कमी वेळ असेल तर ती वरच्यावर असते, असे डॉ. मोहिते यांनी सांगितले.
गळफासामध्ये मानेवरची गाठ जर मागच्या बाजूला असेल तर जिभेला ती मागच्या बाजूने खेचते, त्यामुळे जीभ बाहेर येत नाही. त्यामुळे मृत्यू नैसर्गिक असो किंवा अपघाती, जीभ काही प्रमाणात दातांमध्ये दबलेल्या अवस्थेतही असू शकते, असे ते म्हणाले.
एखादी व्यक्ती जर हट्टीकट्टी असेल आणि ती नशेत नसेल तर तिला कोणी फासावर लटकविण्याचा प्रयत्न केल्यास ती तीन ते चार लोकांनाही सहजासहजी आवरणार नाही. ती मारेकºयाचा हात, पाय तसेच शरीराचा एखादा भाग पकडण्याचा प्रयत्न करणार. या दरम्यान समोरच्याला किंवा त्या व्यक्तीला स्वत:ला कुठेतरी दुखापत होते. त्यामुळे बºयाचदा त्याच्या नखात झटापट झाल्याचा पुरावा सापडू शकतो, असेही ते म्हणाले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: ... so Sushant's tongue should not have come out!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.