Join us
Daily Top 2Weekly Top 5

... तर लग्न जुळविणारा दोषी कसा?, हायकोर्टाने रद्द केला गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 09:05 IST

उच्च न्यायालयाने रद्द केला गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एका महिलेने तिचा पती व त्याच्या कुटुंबीयांविरोधात दाखल केलेल्या फसवणुकीच्या तक्रारीत विवाह जुळविणाऱ्यावरही (मॅचमेकर) गुन्हा का दाखल केला, असा प्रश्न करत उच्च न्यायालयाने प. बंगालमध्ये राहणाऱ्या मॅचमेकरवरील गुन्हा रद्द केला.तपास अधिकाऱ्यांनी कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर केला आहे, असे निरीक्षण न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने नोंदवले. ऑस्ट्रेलियामध्ये राहायला गेल्यानंतर पतीने याचिकादार पत्नीवर शारीरिक व मानसिक अत्याचार केले. पती व त्याच्या कुटुंबीयांनी तिच्याकडे दागिने व पैशांची मागणी केली. मुंबईला परतल्यावर महिलेने त्यांच्याविरोधात वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि दंडाधिकारी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.

यामध्ये बँकरची काहीही भूमिका नाही. त्याने केवळ वधू व वराच्या कुटुंबीयांची ओळख करून ‘’मध्यस्था’’चे काम केले. वस्तूत: असे दिसते की, याचिकादाराने सद्भावनेने दोन्ही पक्षांचा संपर्क करून दिला. त्यांची एकमेकांना माहिती दिली आणि ओळखही करून दिली. त्याचा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही. एफआयआरमध्ये याचिकादाराबाबत महिलेने तक्रार केली नाही. मात्र, तिने त्यानंतर दिलेल्या अतिरिक्त जबाबात मध्यस्थाबाबत तक्रार केली आहे. मुलाची व त्याच्या कुटुंबीयांबाबत चांगले सांगून मध्यस्थाने फसवणूक केल्याचा आरोप महिलेने केला. मात्र, तसे केल्याचे आम्हाला वाटत नाही, असे म्हणत न्यायालयाने मध्यस्थावरील गुन्हा रद्द केला.

 

टॅग्स :मुंबईउच्च न्यायालयलग्न