...तर महाव्यवस्थापक हितेश मेहताची ‘लाय डिटेक्टर’ चाचणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 05:22 IST2025-02-19T05:21:40+5:302025-02-19T05:22:17+5:30
मेहताने पोलिसांना दिलेल्या माहितीत सुरुवातीला विकासक धर्मेश पौनला ७० कोटी तर सोलर पॅनल व्यावसायिक उन्ननाथन अरुणाचलम ऊर्फ अरुणभाईला ४० कोटी दिल्याचे सांगितले.

...तर महाव्यवस्थापक हितेश मेहताची ‘लाय डिटेक्टर’ चाचणी
मुंबई : न्यू इंडिया को. ऑप. बँकेचा महाव्यवस्थापक असलेला हितेश मेहता तपासात सहकार्य करत नसल्याने त्याची ‘लाय डिटेक्टर’ चाचणी करण्याच्या दृष्टीने आर्थिक गुन्हे शाखेने हालचाली सुरू केल्या आहेत.
मेहताने पोलिसांना दिलेल्या माहितीत सुरुवातीला विकासक धर्मेश पौनला ७० कोटी तर सोलर पॅनल व्यावसायिक उन्ननाथन अरुणाचलम ऊर्फ अरुणभाईला ४० कोटी दिल्याचे सांगितले. त्यानंतर ५० कोटी दिल्याचे सांगितले. धर्मेशच्या म्हणण्यानुसार, मेहताने १२ ते १३ कोटी दिल्याचा दावा केला आहे. त्यामुळे मधल्या पैशांचे नेमके काय झाले? उर्वरित १२ कोटींचे काय झाले? याबाबत मेहता काहीतरी माहिती लपवत असल्याचा संशयाने त्याची लाय डिटेक्टर चाचणी करण्याबाबत आर्थिक गुन्हे शाखा विचार करत आहे.
१३० कोटींहून अधिक कॅश इन हँड...
प्राथमिक तपासात बँकेत १३० कोटींहून अधिकची रोकडची ‘कॅश इन हँड’मध्ये नोंद होती. त्यापैकी १२२ कोटींवर मेहताने अन्य साथीदारांच्या मदतीने डल्ला मारला. एकाच वेळी कोट्यवधी रुपयांमध्ये पैसे बाहेर जात होते. मात्र, त्याकडे कुणाचेच कसे लक्ष गेले नाही? बँकेची कॅश लिमीट किती असते?, शंभर कोटींचा टप्पा ओलांडल्यानंतरही कामकाज कसे सुरू होते? अशा अनेक प्रश्नांचा आर्थिक गुन्हे शाखा शोध घेत आहे.