Join us

..तर बांधकामावरच बंदी! मुंबई परिसरातील सहा हजार बांधकामे महापालिकेच्या रडावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 06:39 IST

बांधकामांत खासगी-शासकीय असा भेदभाव केला जाणार नाही, अशी सक्त ताकीदही आयुक्तांनी बैठकीत दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई :  मुंबईत सुरू असलेल्या सहा हजार बांधकामांच्या ठिकाणी धूळ व प्रदुषण नियंत्रणाची उपाय केले नाहीत तर त्या बांधकामांवरच बंदी आणण्याचा निर्णय महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या बैठकीत घेण्यात आला. 

या बांधकामांत खासगी-शासकीय असा भेदभाव केला जाणार नाही, अशी सक्त ताकीदही आयुक्तांनी बैठकीत दिली. धूळ व प्रदूषण नियंत्रणाची नवीन मार्गदर्शक तत्त्वे सोमवारपर्यंत जारी करण्याची सूचनाही देण्यात आली आहे. हवेच्या घसरत चाललेल्या गुणवत्तेवरुन पालिकेवर सतत टीका हाेत आहे. त्याची दखल घेत पालिका प्रशासनाने शुक्रवारी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. आता बांधकामांच्या ठिकाणी सूचनावजा नोटिसा न पाठविता थेट कारवाई केली जाणार आहे. बैठकीस पालिकेसह एमएमआरडीए, एसआरए, एमएमआरसीएल, म्हाडा, एमआयडीसी आदी तसेच क्रेडाई, एमसीएचआय, नारडेको, पीईटीए यांचे प्रतिनिधी हाेते.

महापालिकेच्या सूचना... प्रदूषणाला कारणीभूत बांधकामाच्या ठिकाणी १५ दिवसांत धूळ प्रतिबंधक यंत्रे (अँटी स्मॉग मशिन) बसविले जावेत.  बांधकामाच्या ठिकाणी वायू गुणवत्ता निर्देशांक मोजणारी यंत्रणा आवश्यक.  बांधकाम पूर्णत: झाकलेलेच असावे. पाडतानाही आच्छादन करावे. शासकीय प्रकल्पांनाही सर्व सूचना लागू असतील.  मेट्रो, रस्ते, उड्डाणपूलांवर ३५ फूट उंचीच्या आच्छादनांसह स्प्रिंकलर व अँटी स्मॉग गनची व्यवस्था असावी. कामगारांना मास्क, चष्मा असे साहित्य दिले जावे. 

बांधकाम साहित्य, डेब्रिज नेणारे वाहन झाकलेले असावे. मर्यादेपेक्षा अधिक वजन वाहून नेऊ नये. बांधकामाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावून वाहनांच्या चाकांची प्रत्येक खेपेनंतर स्वच्छता केली जाते की नाही, याची तपासणी आवश्यक.वाहनांची वाहतूक बेजबाबदारपणे केली जात असेल तर चालकांवर विशेष पथकाच्या माध्यमातून दंडासोबत कायदेशीर कार्यवाही. रात्रीच्या वेळी निर्जन ठिकाणी डेब्रिज टाकल्याचे दिसते. त्यासाठी पथकांची स्थापना करावी. त्यांनी रात्री गस्त करून थेट कारवाई करावी.

 पालिका २४ वॉर्डात किमान ५० पथके ठेवणार.  उपाययोजनामध्ये त्रुटी आढळल्यास जागेवरच काम थांबविण्याची नोटीस देणार. सहायक आयुक्तांवर त्यांच्या अखत्यारीतील रस्त स्वच्छतेची व बांधकामांची जबाबदारी.  वर्दळीच्या ५० ते ६० रस्त्यावर अँटी स्मॉग मशीन व स्प्रिंकलरची फवारणी. पेट्रोल व डिझेलवर चालणाऱ्या व कालबाह्य झालेल्या वाहनांवर कारवाईच्या सूचना. मुंबईतील वीज, ऊर्जा, गॅसविषयक मोठ्या प्रकल्पांतून होणाऱ्या वायू प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी नियुक्ती होणार. माहूल सारख्या परिसरांमध्ये यापुढे नियमितपणे व सक्तीने उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची सूचना.

टॅग्स :पर्यावरण